ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकल्यास पाकिस्तानला फुटेल घाम, पंतप्रधान मोदींचे काश्मीरमधे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू आणि काश्मीरमधील कटरा आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जनसभेला संबोधित करताना मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा आणि पाकिस्तानचा उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदींनी कटरा आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, ही काश्मीर खोरे आणि जम्मू प्रदेशातील पहिली रेल्वे सेवा आहे. तसेच पंतप्रधानांनी चिनाब रेल्वे पूल आणि अंजी पुलाचे उद्घाटनही केले. यावेळी जनसभेला संबोधित करताना मोदींनी ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. पंतप्रधानांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
पाकिस्तानचा मानवतेवर हल्ला
काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘हा मानवतेवर हल्ला होता. आपला शेजारी देश मानवतेच्या विरोधात आहे. पाकिस्तानचा हेतू भारतात दंगली घडवणे, काश्मीरमधील कष्टकरी लोकांचे उत्पन्न थांबवणे हा होता, त्यामुळे पाकिस्तानने पर्यटकांवर हल्ला केला. मात्र जम्मू-काश्मीरमधील तरुणांनी दहशतवादाला योग्य उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकून पाकिस्तानला पराभव आठवेल – पीएम मोदी
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावर बोलताना मोदींनी म्हटले की, ‘आज ६ जून आहे. योगायोगाने एक महिन्यापूर्वी याच रात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात आला होता. यापुढे जेव्हा जेव्हा पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल तेव्हा त्याला दारूण पराभवाची आठवण येईल.’
पाकिस्तान मानवतेच्या विरोधात – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, “आपण काश्मीरमधील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सतत वाढवत आहोत आणि त्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणजे पर्यटन. पर्यटन रोजगार प्रदान करते, तसेच पर्यटन लोकांना जोडते. पण दुर्दैवाने आपल्या शेजारील देश पर्यटनाच्या विरोधात आहे. म्हणजेच हा असा देश आहे जो गरिबांच्या उपजीविकेच्या विरोधात आहे.”
जम्मू आणि काश्मीरमध्ये विकासकामांचा धडाका
गेल्या काही वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये विकासकामांचा वेग वाढला आहे. आज पंतप्रधानांनी कटरा आणि श्रीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला, यासोबतच चिनाब रेल्वे पूल आणि अंजी पुलाचे उद्घाटन केले. त्यानंतर मोदींनी रियासी जिल्ह्यातील कटरा येथे ४६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यामुळे आता आगामी काळात काश्मीरमधील विकास आणखी वेगाने होणार आहे.
