…तर फक्त विध्वंस, महाविध्वंस होईल, नरेंद्र मोदींनी पाकला खडसावलं!
तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवरून भारतीय सेनेच्या जवानांना संबोधित केलं आहे. त्यांनी आपल्या या भाषणात पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावून सांगितलं आहे.

Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअर बेसवरून भारतीय सेनेच्या जवानांना संबोधित केलं आहे. त्यांनी आपल्या या भाषणात पुन्हा एकदा पाकिस्तानला खडसावून सांगितलं आहे. आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर त्याचा परिणाम हा फक्त विध्वंस हाच असेल, असं मोदी यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे कौतुक केले.
नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
ऑपरेशन सिंदूर हे काही सैनिकांचे सामान्य अभियान नाही. हे ऑपरेशन म्हणजे भारताची नीती, भारताची नियत तसेच भारताच्या निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे. भारत हा बुद्धाचा देश आहे. सोबतच भारत हा गुरु गोविंदसिंग यांचाही देश आहे. अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा आहे. त्यामुळेच आपल्या बहिणी, मुलींचं सौभाग्य हिसकावून घेण्यात आलं, त्यानंतर आपण दहशतवादच्या फण्याला त्यांच्या घरात घुसून नेस्तनाबूत करून टाकलं, असं मोदी म्हणाले.
100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं- मोदी
तसेच, ऑपरेशन सिंदूरवर बोलताना त्यांनी पाकिस्तानलाही खडसावलं आहे. “ते लपून आले आणि हल्ला केला. मात्र त्यांनी ज्यांना डिवचलं होतं, ती भारताची सेना आहे, हे ते विसरले होते. भारतीय सेनेने समोरासमोर जाऊन हल्ले केले आहेत. भारतीय सेनेने दहशतवादाच्या अनेक तळांना मातीत मिसळून टाकलं. 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून टाकलं. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. दहशतवाद्यांच्या आकांना आता समजलं आहे की भारतावर करडी नजर टाकली तर त्याचे परिणाम भोगावले लागतील,” असा इशाराच मोदी यांनी पाकिस्तानला दिला.
विध्वंस आणि महाविध्वंस हा एकच परिणाम
भारतावर नजर रोखली तर विध्वंस हाच एकमेव पर्याय असेल. भारतात निरापराध लोकांचे रक्त वाहत असेल तर विध्वंस आणि महाविध्वंस हा एकच परिणाम असेल. ज्या दहशतवाद्यांच्या जीवावर जे दहशतवादी बसले होते, त्या पाकिस्तानी सैन्यालाही आपण धूळ चारली आहे, अशा शब्दांत मोदी यांनी भारतीय सेनेचे कौतुक केले.
