कोणी जायच्या आधी तुम्ही जा, लाडकी बहीण योजना राबवण्याचं नाटक करा, अर्जुन खोतकर यांचा व्हिडीओ व्हायरल
एकनाथ शिंदे गट आणि भाजपा नेत्यात या योजनेवरुन श्रेयवाद सुरू झाला आहे. जास्तीत जास्त महिलांची नोंद करण्याचे आदेश अर्जून खोतकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
जालना – राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना जाहीर झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारला मध्यप्रदेश राज्यात भाजपाला जसे विधानसभेत यश मिळाल्याने तसेच यश आता महाराष्ट्रात मिळणार याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खात्री मिळाली आहे. त्यामुळे राज्यात या योजनेचे महिलांनी कौतूक केले आहे.या योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याच्या कामाला महिला लागल्या आहेत. यातच आता मंत्री अर्जुन खोतकर यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या अजब सल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राज्यात धुमधडाक्यात सुरु करीत असल्याची घोषणा केली आहे. 21 ते 60 वर्षाच्या महिलांसाठी ही योजना आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला बॅंक खात्यात जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ही योजना विधानसभा निवडणूकांना डोळ्यांसमोर ठेऊन जाहीर केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबविण्यासाठी गावागावातील महिलांची यादी जमा करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. #Maharashtra #mukhyamantriladkibahinyojana #MaharashtraAssembly #MaharashtraGovernment #MaharashtraNews pic.twitter.com/XJaHgFZH1a
— Atul B. Kamble (@atulkamble123) July 2, 2024
त्यातच आता माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या अजब सल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गावागावात जाऊन ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राबवण्याचं नाटक करा असा सल्ला अर्जून खोतकर यांनी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी इतर पक्षाचे कार्यकर्ते काम हातात घेण्यापूर्वी गावागावात जाऊन योजना राबवण्यासाठी नाटक करा असेही त्यांनी सांगितल्याचे दिसत आहेत.
माजी मंत्री अर्जुन खोतकर कार्यकर्त्यांना सूचना
जालन्यात आज शिवसेना उपनेते माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपल्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत ‘मुख्यमंत्री लाडली माझी बहीण’ या योजनेसाठी गावागावात फिरा, प्रत्येक घराघरात फिरा, वाटेल ते नाटकं करा, मुद्दामहून महिलांचे आधार कार्ड घ्या, पॅन कार्ड घ्या, ही योजना समजून सांगा. आपण ही योजना गावात पहिली आणली असं भासवा. इतर पक्षाच्या आधी काम सुरु करा, आपण काम सुरु केलं नाही तर ते दुसरे काम करतील, असा सल्ला देणारा खोतकराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात महायुतीत श्रेय वादाचा मुद्दा पुन्हा चहाट्यावर आला आहे.