संस्कृत भाषेसाठी ऐतिहासिक क्षण! महामहोपाध्याय भद्रेशदास स्वामींना मिळाला मानाचा ‘सरस्वती सन्मान 2024’ पुरस्कार
बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे विद्वान संत महामहोपाध्याय भद्रेशदास स्वामी यांना त्यांचा संस्कृत ग्रंथ "स्वामीनारायण सिद्धांत सुधा" (2022) साठी के.के. बिर्ला फाउंडेशनने देशातील प्रतिष्ठित "सरस्वती सन्मान 2024" प्रदान केला.

बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे विद्वान संत महामहोपाध्याय भद्रेशदास स्वामी यांना त्यांचा संस्कृत ग्रंथ “स्वामीनारायण सिद्धांत सुधा” (2022) साठी के.के. बिर्ला फाउंडेशनने देशातील प्रतिष्ठित “सरस्वती सन्मान 2024” प्रदान केला. एखाद्या संताला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे . तसेच 22 वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या संस्कृत ग्रंथाला हा सन्मान मिळाला आहे. त्यामुळे हा संस्कृत भाषेसाठी अभिमानाचा क्षण बनला आहे.
अहमदाबाद येथील शाहिबाग येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात झालेल्या या भव्य समारंभाला गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रत, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अर्जुन कुमार सिकरी, अनेक विद्यापीठांचे कुलगुरू आणि हजारो भाविक उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यातील आपल्या भाषणात न्यायमूर्ती अर्जुन कुमार सिकरी म्हणाले की, “22 भाषांमधील पुस्तकांचे पुनरावलोकन केल्यानंतर, हे पुस्तक सर्वोच्च आणि अद्वितीय असल्याचे सिद्ध झाले. भद्रेशदास स्वामींना सन्मानित करताना असे वाटते की या पुरस्काराचाच गौरव होत आहे.
संत महामहोपाध्याय भद्रेशदास स्वामी यांनी हा मानाचा सन्मान गुरु, श्रीप्रभु स्वामी महाराज आणि महंत स्वामी महाराज यांना समर्पित केला. यावेळी बोलताना स्वामी म्हणाले की, “ही माझी वैयक्तिक कामगिरी नाही, तर संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी मिळालेली एक पवित्र जबाबदारी आहे.” बीएपीएसचे ज्येष्ठ संत पूज्य ब्रह्मविहारीदास स्वामी यावेळी म्हणाले की “हा सन्मान केवळ एका संताचा नाही तर संपूर्ण भारतीय संत समुदायाचा आहे. त्याचा प्रभाव केवळ साहित्यिक नसू्न तो तो संस्कृतीवरही आहे.”
सरस्वती सन्मान हा भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे, जो दरवर्षी के.के. बिर्ला फाउंडेशनद्वारे 1991 पासून दिला जात आहे. यात प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि 15 लाख रुपयांचा समावेश आहे.
दरम्यान, स्वामीनारायण सिद्धांत सुधा ग्रंथ अक्षर-पुरुषोत्तम तत्वज्ञानाचे तार्किक आणि सखोल शैलीत, वेदांताच्या तत्त्वांशी सुसंगतपणे सादरीकरण करण्यात आले आहे. यात समानता, ज्ञान आणि मुक्ततेच्या मूल्यांवर भाष्य करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक सन्मान संस्कृतच्या शाश्वत वैभवावर प्रकाश टाकतो आणि भारतीय तत्वज्ञानाला जागतिक मान्यता देतो.
