Rahul Gandhi : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंग! लोकशाहीसाठी तर हे सर्वात घातक, असे का म्हणाले राहुल गांधी
Rahul Gandhi Big Statements : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कार्यकर्ते आणि जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांच्या या निवडणुकीविषयीच्या भाष्याने सध्या देशात काहूर उठले आहे. महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंग या त्यांच्या विधानाचे कांगोरे काय आहेत?

बिहारमध्ये या वर्षा अखेरीस विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षही बिहारच्या रणभूमीत उतरला आहे. काँग्रेसला राज्यात मोठी मुसंडी मारण्याची इच्छा आहे. बिहारमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू आहे. त्यातच विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या बिहार दौर्यावर आहेत. त्यांनी बिहारमध्ये आल्या आल्याच आरोपांची एकच राळ उडवून दिल्याने देशभर त्याची चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांनी एका लेखातून मोठे भाष्य केले आहे.
महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंग
“महाराष्ट्रनंतर आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंगची तयारी सुरू आहे.” या त्यांच्या वक्तव्याने सध्या राजकीय धुरळा उडवून दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आरोप केला. संध्याकाळी अचानक ईव्हीएमचे मतदान कसे वाढले असा सवाल यापूर्वी राहुल गांधी यांनी विचारला होता. त्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगच गोत्यात आला होता. त्यावर आयोगाने स्पष्टीकरण दिले होते.
महायुतीच्या विजयाला मॅच फिक्सिंगचे पाठबळ
काँग्रेस नेते राहुल गांधीं यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. त्यांनी भाजपावर विजय मिळवण्यासाठी मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर आसूड ओढला होता. भाजपा, शिंदे सेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली होती. महायुतीने 288 पैकी 235 जागांवर विजय मिळवला. त्यापैकी 132 जागा एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. ही आतापर्यंतची या पक्षाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

राहुल गांधीचा घणाघात
महाराष्ट्राच्या निवडणुकीत हेरफेरीचा आरोप
राहुल गांधी यांनी या लेखात भाजपवर मोठा घणाघात घातला. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोठी हेराफेरी केल्याचा आरोप केला. पाच स्तरावर हा प्रकार केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी आरोप केला.
निवडणूक आयोगाच्या पॅनलमध्ये नियुक्तीत हेराफेरी करण्यात आली
बोगस मतदार मतदार यादीत घुसवले
मतदानाचा टक्का कृत्रिम रित्या वाढवला
भाजपला जिथं जिंकायचं तिथंच बोगस मतदानाच प्रयोग करण्यात आला
सर्व पुरावे लपवले
मॅच फिक्सिंग लोकशाहीसाठी घातक
महाराष्ट्रात भाजपा सुरुवातीला हताश होती, पण मॅच फिक्सिंगने त्यांनी निवडणूक जिंकली. जो पक्ष फसवणूक करतो, तो खेळ जिंकू शकतो. पण यामुळे संस्था कमकुत होतात आणि लोकांचा निकालांवरील विश्वास संपतो, असे राहुल गांधी म्हणाले. याविषयीचे पुरावे तपासण्याचे आवाहन गांधी यांनी लेखातून केले. त्यानंतर जनतेने निर्णय घ्यावा असे ते म्हणाले. आता महाराष्ट्रात जी मॅच फिक्सिंग झाली तीच बिहारमध्ये होईल. तसे झाले नाही तर भाजप निवडणूक हारू शकते. मॅच फिक्सिंग ही कोणत्याही लोकशाहीसाठी घातकच असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
