अमेठीमध्ये पुन्हा राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी सामना, प्रियंका गांधी ही मैदानात
Loksabha election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये स्मृती इराणी यांना पुन्हा एकदा अमेठीतून उमेदवारी देण्यात आली आहे. आता अमेठीत पुन्हा एकदा राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे.

Loksabha election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठी आणि वायनाडमधून लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे अमेठीत पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी असा सामना पाहायला मिळणार आहे. मागच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठीत पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत प्रियांका गांधी या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्या रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
अमेठीतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात
राहुल गांधी यांनी 2004 साली अमेठीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यावेळी ते प्रचंड मतांनी विजयी झाले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला होता.
राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेतून देशभरात लोकांना भेटत आहेत. याचाच भाग म्हणून ते अमेठीला देखील गेले होते. या वेळी राहुल या जागेवरून निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात होते. राहुल यांचे दिवंगत काका संजय गांधी, दिवंगत वडील राजीव गांधी आणि आई सोनिया गांधी हे देखील अमेठीमधून खासदार राहिले आहेत.
स्मृती इराणी यांचे आव्हान
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले होते आणि एनडीए आणि यूपीए या दोघांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीवर चर्चा करण्यास सांगितले होते. स्मृती इराणी यांनी त्यांना आव्हान दिले होते की, राहुल गांधी, तुम्ही मैदान निवडा, आम्ही कार्यकर्त्यांची निवड करू.
त्यांच्यासमोर युवा मोर्चाचा कोणताही कार्यकर्ता बोलू लागला तर ते बोलायला विसरतात, असेही स्मृती म्हणाल्या होत्या. नागपुरातील ‘नमो युवा महासंमेलन’ कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी हे वक्तव्य केले होते.
भाजपकडून पहिली यादी जाहीर
भाजपने आपल्या उमेदवाराच्या पहिल्या यादीत स्मृती इराणी यांच्या नावाची देखील घोषणा केली होती. भाजपने पहिल्या यादीत १९५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा वाराणसीतून तर अमित शाह हे गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने दोन माजी मुख्यमंत्र्यांना देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. ज्यामध्ये मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाचा देखील समावेश आहे.
