अहमदाबाद विमान अपघातामागे तुर्कीचा हात? पाकिस्तानचं नाव घेत रामदेव बाबांचा खळबळजनक दावा!
योगगुरू रामदेव बाबा यांनी अहमदाबाद विमान अपघातावर मोठी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी मोठा दावा केला आहे.

Ahmedabad Plane Crash : अहमादबाद येथे एअर इंडिया कंपनीचे विमान कोसळले. या विमानात एकूण 242 प्रवासी होती. एक वगळता या सर्वांचाच या अपघातात मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण काय? याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या अपघाताबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. असे असतानाचा आता योगगुरू रामदेव बाबा यांनी मोठी शंका व्यक्त केली आहे. या अपघातामागे ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान वादाची किनार असू शकते असं असा अंदाज व्यक्त करत त्यांनी या अपघातात तुर्की या देशाचा काही हात आहे का? याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे. ते दिल्लीमध्ये एएनआयशी बोलत होते.
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर….
योगगुरू रामदेव बाबा यांनी या अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी केली पाहिजे, असं म्हटलंय. तसेच या अपघाताचा कट तुर्की या देशात तर रचला गेला नाही ना? याची चौकशी व्हायला हवी, असंही त्यांनी म्हटलंय. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठे हल्ले केले होते. या तणावाच्या स्थितीत तुर्की हा देश पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला होता. असे असताना रामदेव बाबा अहमदाबाद विमान अपघातात तुर्कीचा हात तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली आहे.
रामदेव बाबा नेमकं काय म्हणाले?
रामदेव बाबा यांनी अहमदाबाद विमान अपघाताबाबत शंका व्यक्त केली आहे. ‘माझ्या माहितीनुसार तुर्की देशातली एक कंपनी या विमानाच्या देखभालीचे काम पाहायची. विमान अपघाताची काळजी चौकशी करताना ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. हवाई क्षेत्रावरही भारताने लक्ष घेतली पाहिजे. तुर्कीने विमान अपघाताच्या माध्यमातून भारताविरोधात सूड तर उगवला नाही ना. कारण तुर्की इथलीच एक कंपनी विमानाच्या मेन्टेनन्सचे काम बघत होती,’ असा मोठा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. तसेच विमानाची देखभाल पाहणाऱ्या कंपनीने तर अपघाताचा कट रचला नव्हता ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
कंपनीसोबतचे कंत्राट थांबवण्यात आले होते
अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानाची देखभाल तुर्कीमधील एक कंपनी पाहात होती. दोन महिन्यांआधी या कंपनीसोबतचे कंत्राट थांबवण्यात आले होते. भारताने हवाई क्षेत्रासारख्या संवेदनशील क्षेत्रात भारताने विदेशी लोकांचा हस्तक्षेप थांबवावा लागेल, असं मतही रामदेव बाबा यांनी व्यक्त केलं. दरम्यान, आता रामदेव बाबा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर आता नेमके काय होणार? त्यांच्या या विधानाची तपास संस्था दखल घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
