लिव्ह-इन-रिलेशनशिपपासून राहा दूर, नाहीतर…राज्यपालांनी का केले महिलांना अलर्ट?
Live in Relationship : सध्या अनेक जण लिव्ह-इन-रिलेशनशीपकडे आकर्षीत होत आहेत. तर भारतीय समाजाचा या नात्याला प्रखर विरोध आहे. तर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी महिलांना या नात्याविषयी अलर्ट करत हा इशारा दिला आहे. काय म्हणाल्या राज्यपाल?

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी बुधवारी महिलांविरोधातील वाढत्या अन्यायाकडे लक्ष वेधत मोठे वक्तव्य केले. त्यांनी महिलांविरोधातील हिंसाप्रकरणात वाढ होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी महिलांना व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी तरुणींना खास सल्ला दिला. लिव्ह-इन-रिलेशनशीपपासून तरुणींनी चार हात लांब राहावे, कारण ही नाती त्यांचे शोषण करतात. शोषणासाठी त्यांची शिकार या नात्यामुळे होते असे त्यांनी सांगितले. वाराणसी येथे महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या 47 व्या दीक्षांत कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी आणि मेडल देऊन शाबासकी दिली.
लिव्ह इन रिलेशनशीपपासून दूर राहा
आनंदीबेन पटेल यांनी तरुणींना मोठा सल्ला दिला. मुलींनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सावध असायला हवे. त्यावर विचार करायला हवा. लिव्ह-इन-रिलेशनशीपसारख्या नात्यांपासून दूर राहावे. कारण यामुळे त्यांचे शोषण होते, असे पटेल म्हणाल्या. विद्यार्थिंनीने त्यांच्या व्यक्तिगत जीवनात निर्णय घेताना सजग आणि सतर्क राहावे. निर्णय घेताना बुद्धीचा वापर करावा. अशा लोकांपासून दूर राहावे, जे तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतली असा सल्ला पटेल यांनी दिला.
केवळ पदवी मिळवणे हा शिक्षणाचा उद्देश नाही
शिक्षण हे जीवनात अमुलाग्र बदल आणण्याचे साधन आहे. केवळ प्रमाणपत्र मिळवण्याचे हे साधन नाही. शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे नाही असा संदेश त्यांनी विद्यार्थांना दिला. आपल्या जीवनात स्वयंशिस्त,कर्तव्य आणि देशभक्ती असावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तुमचे वसतीगृह आणि महाविद्यालयाची देखभाल करा. आठवडाभरात कमीत कमी एक तास तरी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हा. तुमच्या आजूबाजूचा परिसर अजून चांगला करण्यासाठी सक्रीय योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. तर पर्यावरण संरक्षणावरही राज्यपालांनी भर दिला. मानवी हस्तक्षेप वाढल्यानेच नैसर्गिक संकट ओढवते असे त्यांनी स्पष्ट केले. आपण पर्यावरणाला धक्का लावला. तेव्हा पर्यावरण संतुलनाची जबाबदारी आपलीच असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी तृतीयपंथियांच्या शिक्षणावरही मोलाचे विचार मांडले.
