AI-171 ने उड्डाण केल्यानंतर २६ सेकंदात काय घडले? अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात नवा खुलासा
फ्लाइटला टेक ऑफ करण्यासाठी ३ सेंकद लागले. त्यानंतर दोन्ही इंजिनाचे इंधन नियंत्रण बटन सरळ कटऑफमध्ये गेले. इलेक्ट्रीक प्रणालीत बिघाड झाल्यामुळे इंजिनाच्या कंट्रोल युनिटला चुकीची माहिती मिळाली. त्यामुळे इंजिनाला होणारा इंधन पुरवठा थांबला.

Air India Plane Crash: अहमदाबादवरुन लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा (AI-171) १२ जून रोजी अपघात झाला होता. या अपघाताच्या चौकशीचे काम सुरु आहे. तपास पथकाकडून बोइंग ड्रिमलाइनरच्या ढिगाऱ्यांची तपासणी केली जात आहे. त्या तपासणीत धक्कादायक खुलासा झाला आहे. बोईंग ड्रीमलायनर विमानाच्या अवशेषांची तपासणी करणाऱ्या पथकाला विमानाच्या मागील भागात (टेल सेक्शन) आग लागल्याचे चिन्ह आढळली आहेत. विमान अपघात आणि इंधन स्फोटामुळे मागील भागाला तुलनेने कमी नुकसान झाले. विमानाच्या काही इलेक्ट्रिक पार्ट्स मर्यादित आग लागली होती. त्यामुळे उड्डाणादरम्यान २६ सेकंदात वीज पुरवठ्यात समस्या आली असावी, असे संकेत दिले जात आहे.
इलेक्ट्रीक प्रणालीत बिघाड?
‘इंडियन एक्सप्रेस’ नुसार, भारतीय विमान दुर्घटना तपासणी पथकाने (AAIB) १२ जुलै रोजी प्राथमिक तपास अहवाल दिला. त्यात म्हटले की, फ्लाइटला टेक ऑफ करण्यासाठी ३ सेंकद लागले. त्यानंतर दोन्ही इंजिनाचे इंधन नियंत्रण बटन सरळ कटऑफमध्ये गेले. इलेक्ट्रीक प्रणालीत बिघाड झाल्यामुळे इंजिनाच्या कंट्रोल युनिटला चुकीची माहिती मिळाली. त्यामुळे इंजिनाला होणारा इंधन पुरवठा थांबला. तसेच विमानाच्या मागील भागात असलेले ऑक्झिलरी पॉवर युनिट चांगल्या परिस्थिीत आहे. परंतु मागील ब्लॅक बॉक्स बराच खराब झाला आहे, ज्यामुळे डेटा काढणे कठीण होत आहे. या परिस्थितीत समोरील ब्लॅक बॉक्समध्ये मिळालेला डेटा तपासासाठी फायदेशीर ठरत आहे.
विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशी विश्वासकुमार रमेश यांनी सांगितले होते की, विमानाच्या कॅबिनचा विद्युत पुरवठात वारंवार खंडीत होत होता. विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्याचे ते संकेत आहेत.
AI-423 मधील पायलटची तक्रार
अपघातापूर्वी दिल्लीवरुन अहमदाबाद जाणाऱ्या फ्लाइट AI-423 मधील पायलटने STAB POS XDCR (Stabilizer Position Transducer) मध्ये बिघाड झाल्याची तक्रार दिली होती. हा सेन्सर फ्लाइटच्या पिचला कंट्रोल करतो. तसेच विमानाच्या कंट्रोल सिस्टमला डाटा पाठवतो. अहमदाबादमध्ये तपासणी केल्यानंतर अभियंत्याने उड्डाणाला मंजुरी दिली होती. परंतु अधिकारी आता या सेन्सरच्या बिघाडाचे कारण विद्युत यंत्रणेतील समस्येशी जोडत आहेत.
