BLOG: विधानसभेत आलेला नवा वाघ; जबाबदाऱ्या अनेक!

विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. त्यामुळे कोण हरलं. कोण जिंकलं याची चर्चा घराघरात, गावागावात, चौकाचौकात, वाड्या वस्तीवर, गल्लोगल्ली, न्यूज चॅनलच्या न्यूज रूममध्ये, न्यूज पेपरच्या संपादक मंडळात, पानाच्या टपरीवर, चहाच्या ठेल्यावर, बस स्थानकात, ट्रेनच्या गर्दीत सगळीकडं होत आहे.

BLOG: विधानसभेत आलेला नवा वाघ; जबाबदाऱ्या अनेक!

विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. त्यामुळे कोण हरलं. कोण जिंकलं याची चर्चा घराघरात, गावागावात, चौकाचौकात, वाड्या वस्तीवर, गल्लोगल्ली, न्यूज चॅनलच्या न्यूज रूममध्ये, न्यूज पेपरच्या संपादक मंडळात, पानाच्या टपरीवर, चहाच्या ठेल्यावर, बस स्थानकात, ट्रेनच्या गर्दीत सगळीकडं होत आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चा होते आहे ती नव्याने निवडून आलेल्या नव्या युवकांची. या सगळ्या नव्या युवकांकडे उद्याचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. या युवकांमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर आहेत. काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री बंटी पाटील यांचे बंधू ऋतुराज पाटील, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख, माजीमंत्री बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव जीसीन सिद्धकी देखील आहेत.

या युवा राजकारण्यांपलिकडे कोणाचाही वारसा न लाभलेला सगळ्यात आगळावेगळा एक युवक देखील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करतोय. एक नवा वाघ विधानसभेच्या आखाड्यात आला आहे. फक्त हा नावाचा वाघ नाही. कामाचाही वाघ आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विदर्भाचा चेहरा देवेंद्र भुयार.

देवेंद्र भुयार याने दोन वेळा आमदार असलेल्या आणि राज्याचे विद्यमान कृषिमंत्री पद भूषवत असलेल्या अनिल बोंडे यांचा पराभव केला आहे. देवेंद्र भुयार याच्या घरात ना कोणी आमदार आहे, ना कोणी खासदार, ना कोणी मंत्री. अगदी राजकीय कोरी पाटी असणारा हा तरुण देवेंद्र भुयार शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता आहे. स्वतःची क्रांती नावाची संघटना स्थापन करून देवेंद्र भुयार विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेत होता. त्याच वेळेस त्याची भेट झाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांच्याशी झाली. रविकांत तुपकर यांनी देवेंद्र भुयारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आणून विदर्भाचा अध्यक्ष केला. विदर्भात स्वाभिमानीचे काम करत असताना देवेंद्र भुयार जिल्हा परिषद निवडणूक लढून जिंकूनही आला.

मी पहिल्यांदा देवेंद्र भुयार याला 2016 मध्ये मंत्रालयातील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनामध्ये पाहिले. त्यावेळी देवेंद्रला तडीपारीची नोटीस आली होती. त्याला अमरावती जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत होती. अर्थात देवेंद्रने शेती प्रश्ना संदर्भातच आंदोलन केलं होतं. शेतमालाला भाव मिळावा म्हणून रस्ता रोको केला होता. उपोषण केले होते. सत्तेला सळो की पळो करून सोडलं होतं आणि त्याचमुळे देवेंद्रच्या पाठीमागे सत्ताधारी लागले होते. त्यावेळी देवेंद्र जिल्हा परिषदेचा सदस्य होता.

अनेक अडचणींना टक्कर देत, भल्याभल्यांना पाणी पाजत, अनेक संकटं झेलत देवेंद्र अमरावतीच्या जिल्हा परिषदमध्ये पोहोचला होता. त्याची शेती प्रश्नाकडे असलेली ओढ बघून स्वाभिमानाने त्याला विदर्भाची जबाबदारी दिली होती. हीच तळमळ देवेंद्रच्या प्रगतीच्या आड येत होती. त्याचमुळे पोलिसांनी बळाचा वापर करत देवेंद्रला रोखण्याचा प्रयत्न केला. खोटे गुन्हे दाखल करून त्याला राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला जात होता.

सत्तेत असलेले सदाभाऊ आणि राजू शेट्टी मनात असूनही देवेंद्रची तडीपारी कमी करू शकत नव्हते. त्यावेळेस राजू शेट्टीही वैतागलेले होते. सत्तेत असून जर आपल्याच लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात असेल, तडीपार केले जात असेल तर असल्या सत्तेत राहून काय करायचं? असा प्रश्न राजू शेट्टी व्यक्त विचारत होते. पुढे सदाभाऊ राजू शेट्टी वेगळे होत, राजू शेट्टी सत्तेतून बाहेर पडले इथपर्यंतचा इतिहास तुम्हाला माहिती असेलच. असो. मूळ मुद्द्याकडे येऊ या.

दरम्यान, त्यावेळी मी देवेंद्रशी शेती प्रश्न, विदर्भातील प्रश्न, देवेंद्रला होणारा राजकीय त्रास याची कारणं समजून घेण्यासाठी त्याच्याशी बोलत उभा राहिलो होतो. सरळ नाकाचा, दाढी वाढवलेला, लांब केस वाढवून पाठीमागेही हिप्पी वाढवलेला, लाल गंधाचा नाम ओढलेला देवेंद्र शांतपणे आदबीने भाऊ भाऊ असं बोलत त्याच्या व्यथा सांगत होता. देवेंद्रच्या बोलण्यातून जाणवत होतं की, चळवळीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडणाऱ्या तरुणांना कशा पद्धतीने व्यवस्था त्रास देते. ‘शेती प्रश्‍नासाठी माझा जीव गेला तरी मी काम करत राहणार,’ असा निर्धार देवेंद्र बोलून दाखवत होता. पुढे राजू शेट्टींच्या रेट्यामुळे त्याची तडीपारी कॅन्सल झाली.

परवा मतदानाच्या दिवशी देवेंद्रच्या गाडीवर हल्ला झाला. त्याची कार जाळून टाकण्यात आली. त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यावर 4 राऊंड फायरिंग करण्यात आले. ही बातमी कानावर आली आणि डोळ्यासमोर तो देवेंद्र उभा राहिला. जो म्हणत होता, ‘माझा जीव गेला तरी हरकत नाही पण मी चळवळ सोडणार नाही.’

आता देवेंद्रवर हल्ला कोणी केला? का केला? याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र राजकारणात आल्यावर तुम्हाला नमवण्यासाठी राजकीय नेते कोणत्या थराला जातील याचा काही नेम नसतो. यातून देवेंद्र बरा होऊन आर्वी मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तो एकमेव आमदार आहे. त्यामुळे त्याला आता राज्यातील समस्थ शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन विधानसभेत लढावे लागेल. त्याला मार्गदर्शन करायला बच्चू कडू सारखा शेतकरी प्रश्नांवर नेहमी पोटतिडकीने बोलणारा आमदार आहेच म्हणा.

देवेंद्रला कापसाच्या, सोयाबीनच्या, तुरीच्या, कांद्याच्या, उसाच्या हमीभावावर तर बोलावंच लागेल. पण पिक विम्यामध्ये शेतकऱ्यांची होणारी फसवणुकीवर, पीककर्ज मिळवताना शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणुकीवर सभागृहांमध्ये भांडवं लागेल. सिंचनाच्या प्रश्नासाठी झगडावं लागेल. सभागृहातील मुरब्बी राजकारण्यांशी दोन हात करावेच लागतील. शेतकरी चळवळीच्या मुशीत तयार झालेल्या देवेंद्रला हे अवघड असेल मात्र अशक्य नाही.

(NOTE : लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)