ग्रामपंचायतची इलेक्शन, पक्षांची किती तयारी ?

कोरोनानं (Corona) आठ-दहा महिने घालवलेली जगण्यातली ‘मज्जा’ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

  • गजानन कदम, कार्यकारी संपादक, टीव्ही 9 मराठी
  • Published On - 12:06 PM, 31 Dec 2020
गावागावात निवडणुकीची धामधूम

महाराष्ट्रात सध्या गावाकडं पंचायत इलेक्शनचा (Maharashtra Gram Panchayat Election) नुसता धुरळा उडलाय. थंडीचा पारा कैक ठिकाणी 10 च्या खाली आहे. पण गावागावात राजकीय वातावरणाचा पारा मात्र भर उन्हाळ्यासारखा आहे. कोरोनानं (Corona) आठ-दहा महिने घालवलेली जगण्यातली ‘मज्जा’ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. 30 तारखेलाच उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपल्यानं आता नुसता प्रचाराचा गाजावाजा असेल. ताई-माई-आक्काचं वातावरण आता वॉट्सअप, फेसबुकनं घेतलंय. ग्रामपंचायतच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं सभांपेक्षा वैयक्तिक भेटीवरच जोर. रोज एकदा पॅनेलच्या उमेदवारांची बैठक आणि दिवसभर ज्याला जमेल तसा प्रचार. थोडथोडक्या नव्हे तर 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी ( एका ठिकाणी स्थगिती) ही निवडणूक होतेय. (Maharashtra Gram Panchayat Election)

राज्यात 28 हजार 813 ग्रामपंचायती आहेत. म्हणजे जवळपास अर्धा खेड्यापाड्यांचा महाराष्ट्र या निवडणुकीशी संबंधित आहे. 12 कोटी 43 लाख लोकसंख्येच्या महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभेत 8 कोटी 98 लाख मतदार होते. हीच मतदारयादी ग्रामपंचायत निवडणुकीला वापरली जाणार आहे. म्हणजे किमान 4 कोटी 50 लाख मतदार या निवडणुकीत 15 जानेवारीला मतदान करतील.

नव्या महाराष्ट्रात नवा डाव

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aaghadi) आल्यापासून राजकीय समीकरणं पार बदलून गेलीत. कालपर्यंत मांडीला मांडी लावून बसणारे नेते आता ग्रामपंचायत निवडणुकीत जवळ आलेले दिसतील. अजित पवारांनी (Ajit Pawar) तर “शिवसेनेसोबत खूप काळ राहायचं आहे, त्यामुळं जुळवून घ्या बाबांनो” म्हणत कार्यकर्त्यांना आघाडी धर्मपालनाच्या स्पष्ट सूचनाच दिल्यात. शिवसेनेलाही राष्ट्रवादी सोबत आल्यानं झाला तर फायदाच होणार आहे. शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या आमदारांना मतदारसंघ मजबूत करण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची असेल, कारण सत्ता त्यांच्या ताब्यात आहे.

वाचा :  जिथे ताकद तिथे स्वबळ वापरु, राष्ट्रवादीची पहिल्यांदाच जाहीर भूमिका

काँग्रेसही निवडणूक किती गंभीर घेतेय हे त्यांचे त्यांनाच माहित. पण सत्तेत राहून निवडणूक लढवण्याची ही संधी त्यांनी वाया घालवायला नको. मरगळलेल्या आणि हतोत्साहित काँग्रेस नेत्यांनी या संधीचे सोने करुन पक्ष मजबुतीवर भर द्यायला पाहिजे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाचा इथे कस लागणार आहे. पक्षनेत्यांना ते किती पिटाळतात, किती कामाला लावतात आणि नेते किती मनावर घेतात ते 18 तारखेला कळेलच. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र ही निवडणूक गांभीर्याने घेणार. त्यांच्या सर्वच मंत्र्या-संत्र्यांना आणि आमदारांना ‘साहेब जाब विचारतील’ अशी एक सुप्त भीती कायम असते. ती या निवडणुकीत कामाला येईल. शिवसेनेनं आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या यापूर्वीच बैठका घेऊन सूचना दिल्या असल्यानं शिवसेनेची कामगिरी सुधारली तर नवल वाटायला नको.

भाजपचे एकला चलो

विधानपरिषदेला महाविकास आघाडीनं धडा शिकवल्यानं खडबडून जाग्या झालेली भाजप आता अतिआत्मविश्वासाच्या कोषातून बाहेर येईल. सूक्ष्म नियोजनासाठी प्रसिद्ध असलेली भाजप ग्रामपंचायत निवडणुकीत विधानपरिषदेचा वचपा काढणार हे नक्की. भाजपच्या एका प्रवक्त्यानं पक्षनियोजनाची माहिती देताना, आमचा 1 लाख 42 हजारांहून अधिक सदस्यांचा हिशेब तयार आहे असं सांगितलं. आघाडी एकत्र आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जादा जोर लावा असा आमदारांना आदेशच आहे. सत्तेत असलेल्या बड्या-बड्या नेत्यांच्या ग्रामपंचायतींवर भाजपचा डोळा आहे. सत्ताधारी नेत्यांना गावातच नेस्तनाबूत केलं की बोलायला जागा उरत नाही हा भाजपचा डाव आहे.

मनसे फॅक्टर

मुंबई-पुणे-नाशिकपुरतं अस्तित्व असलेल्या मनसेनं तर ही निवडणूक चार प्रमुख पक्षांपेक्षासुद्धा जास्त गांभीर्यानं घेतलीय. सर्वात आधी त्यांच्याकडूनच तयारीची घोषणा झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. पक्षस्थापनेपासून कधीच ग्रामपंचायत निवडणुकीच्या भानगडीत न पडलेला पक्ष स्थापनेच्या 13 वर्षानंतर गाव-पाड्याच्या निवडणुकीत उतरतोय याचं आश्चर्य वाटत आहे. लोकसभेसारख्या निवडणुका ऑप्शनला टाकणारी मनसे ग्रामपंचायतीत उतरतेय म्हंटल्यावर सामना तिरंगी नाही तर चौरंगी होणार हे निश्चित. ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे राज ठाकरेंनी पक्षमजबुतीचे संकेत दिलेयत हे मात्र निश्चित.

संबंधित बातम्या  

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूक; ग्रामस्थांचा निर्णय काय?

वर्ष नवे, हर्ष नवा, अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुण्यात एकाच मंचावर