भारताचा स्पाय, जो पाकिस्तानच्या आर्मीत मेजर बनला – एक था ब्लॅक टायगर….!

भारताचा स्पाय, जो पाकिस्तानच्या आर्मीत मेजर बनला - एक था ब्लॅक टायगर....!
Ravindra kaushik_Indian spy in Pakistan

बी.कॉम झालेले रवींद्र कौशिक पाकमध्ये गेले त्यावेळी केवळ 23 वर्षांचे होते. एके दिवशी पेपरमध्ये पाकिस्तानी आर्मीकडून काही लोकांची गरज असल्याची जाहिरात प्रसिद्ध होते, रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर ती बघतात, अप्लाय करतात आणि निवडले जातात.

सचिन पाटील

|

Apr 26, 2021 | 4:15 PM

ही गोष्ट आहे देशासाठी पाकिस्तानात हेरगिरी करणाऱ्या एका बहाद्दराची जो पाकमध्ये पकडला गेला, नाव…….”रवींद्र कौशिक”. (Ravindra Kaushik)

1952 साली जन्मलेले रवींद्र कौशिक मूळचे राजस्थानमधल्या श्रीगंगानगरचे, शिक्षण तिथंच झालं. नाटकात काम करण्याची आवड. एका देशभक्तीवरच्या नाटकाच्या शो नंतर भारताची गुप्तचर संघटना रॉ (Raw) ( रिसर्च ॲन्ड ॲनालिसीस विंग ) चे लोक रवींद्र कौशिकना दिल्लीला बोलवतात. दिल्लीतल्या भेटीत देशासाठी पाकमध्ये गुप्तहेर (Spy) म्हणून काम करण्याची ऑफर देतात. रवींद्र कौशिक ही ऑफर स्वीकारतात आणि त्यांचं ट्रेनिंग सुरु होतं.

रवींद्र कौशिक यांना पाकिस्तानात पाकिस्तानी बनूनच हेरगिरी करायची असल्याचं सांगण्यात आलेलं असतं. पाकिस्तानात बॉर्डरलाच रवींद्र कौशिक यांचं घर असल्यानं भाषा वगैरे मिळती-जुळती असते. त्यातच त्यांना संपूर्ण ट्रेनिंग दिलं जातं ज्यामध्ये उर्दू भाषा, नमाज पठण, कुराण पठण, पाकिस्तानी मुस्लिम रिती-रिवाज, पाकची राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक सर्व माहिती दिली जाते.

नबी अहमद शाकीर

१९७५ ते १९७७ या दोन वर्षांच्या ट्रेनिंगमध्ये छोट्या छोट्या असाईनमेंटस् वेगवेगळ्या देशांमध्ये हेरगिरीसाठी पाठवून दिल्या जातात. १९७७ मध्ये पाकिस्तानातलं सरकारी आय.कार्ड, रेशन कार्ड इतर डॉक्युमेंन्टस यांची व्यवस्था केली जाते आणि “नबी अहमद शाकीर” या नावानं दीर्घ काळासाठी रवींद्र कौशिक पाकिस्तानात दाखल होतात. रवींद्र कौशिक यांनी त्यांच्या घरतल्यांना मात्र मी दुबईत नोकरीसाठी जातोय असं सांगितलेलं असतं.

बी.कॉम झालेले रवींद्र कौशिक पाकमध्ये गेले त्यावेळी केवळ 23 वर्षांचे होते. कराचीत गेल्यानंतर पुरवल्या गेलेल्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर कराचीतल्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवतात आणि लॉ पूर्ण करतात. दरम्यानच्या काळात दिलेलं काम सुरु असतं.

पाकिस्तान आर्मीमध्ये भरती 

एके दिवशी पेपरमध्ये पाकिस्तानी आर्मीकडून काही लोकांची गरज असल्याची जाहिरात प्रसिद्ध होते, रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर ती बघतात, अप्लाय करतात आणि निवडले जातात. इकडे रॉ च्या लोकांना याची माहिती मिळते आणि त्यांचा आनंद गगनात मावत नाही. कारण आता थेट पाकिस्तानी आर्मीमध्ये त्यांचा एजन्ट पोहोचलेला असतो. आर्मीमध्ये रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर त्यांच्यातल्या कर्तबगारी आणि गुणांमुळे मेजर पोस्टपर्यंत पोहोचतात.

या दरम्यान अति महत्त्वाची माहिती रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर रॉ कडे पोहोचवत असतात. यामध्ये पाकिस्तानी ॲटोमीक पॉवर स्टेशन संदर्भातली माहिती, सुरक्षा या संबंधीच्या अपडेटस् वगैरे रॉ आणि भारतीय आर्मीला मिळू लागतात.

रॉच्या परवानगीने लग्न

या दरम्यान पाकिस्तानी आर्मीतल्या एका ऑफिसरच्या मुलीबरोबर रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर यांचं अफेअर सुरु होतं. याची कल्पना ते रॉच्या लोकांना देतात आणि रॉच्या परवानगीनं त्या मुलीबरोबर लग्न करतात जीचं नाव असतं “अमानत”.

काही दिवसांत रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर यांना आपण बाप होणार असल्याचं कळतं. याच दरम्यान १९८१ ला भारतात असेलेल्या त्यांच्या छोट्या भावाचं लग्न ठरतं. लाडक्या भावाच्या लग्नाला जाण्याची इच्छा रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर रॉ कडे व्यक्त करतात. रॉ देखील त्यांना सौदी अरेबिया, दुबई मार्गे भारतात अतिशय गुप्तपणे घेऊन येते. दरम्यान आपण दुबईला फिरायला जात असल्याचं बायको अमानत आणि पाकिस्तानी आर्मीला रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर यांनी सांगितलेलं असतं.

चार वर्षांनी कुटुंबीयांशी भेट

जवळ-जवळ चार वर्षांनी रविंद्र कौशिक यांची घरातल्यांशी भेट होते, आणि श्रीगंगानगरमध्यल्या खर्या घरात आनंद उसळतो. भावाचं लग्न धुमधड्याक्यात पार पडल्यानंतर रवींद्र कौशिक यांच्या आजच्या खऱ्या जीवनाबद्दल अनभिज्ञ असलेले घरातले लोक त्यांना लग्नासाठी आग्रह करतात. शेवटी रवींद्र कौशिक आपल्या वडिलांना मी दुबईत लग्न केलंय आणि मला लवकरच मुल होईल असं सांगतात. घरच्यांना वाईट वाटतं पण पुन्हा येताना बायकोला घेऊन येण्याचं आश्वासन रवींद्र कौशिक यांच्याकडून दिलं जातं.

रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर यांचा परतायचा दिवस येतो आणि घरातल्यांचा निरोप घेऊन श्रीगंगानगरमधल्या आपल्या घरातून रवींद्र कौशिक शेवटचं पाऊल बाहेर टाकतात. ही त्यांची त्यांच्या घरातल्यांची शेवटची भेट. पुन्हा दुबई, सौदी अरेबियामार्गे पाकमध्ये रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर दाखल होतात आणि गुप्तहेरगिरीचं काम सुरु होतं.

अनेक कारवाया केल्या, अनेक रोखल्या

असं म्हणतात रविंद्र कौशिक यांनी भारतीय आर्मीला, रॉ ला अनेकदा अति महत्वाची अशी माहिती पुरवली ज्यामुळे अनेक कारवाया करता आल्या. अनेक कारवाया रोखता आल्या, अनेक जवानांचे प्राण वाचले, अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घालता आले.

या दरम्यान रॉकडून इनायत मसी या नावानं आणखी एक एजन्ट पाकमध्ये पाठवला जातो, ज्याला रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर यांच्याकडे काही कागदपत्रं पोहोचविण्यासह पाकमध्ये कौशिक यांच्याबरोबर कॉर्डिनेशनचं काम करायची जबाबदारी दिलेली असते. दुर्दैवानं इनायत मसी बॉर्डवरच पकडले जातात. पाक आर्मीकडून टॉर्चर केलं जातं आणि इनायत मसी खरी माहिती सांगून टाकतात.

रवींद्र कौशिक यांना अटक 

आपल्याचं आर्मीमध्ये भारताचा एजन्ट असल्याचं समजल्यानंतर पाक आर्मीच्या पायाखालची जमीनच सरकते. यानंतर पाक आर्मीकडून एक डाव रचला जातो. इनायत मसी यांना रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर यांना नियोजीत भेटीसाठी पाठवलं जातं. कराचीतल्या जीना गार्डनमध्ये सकाळी ८ वाजता दोघं भेटतात. जशी कागदपत्रांची देवाण-घेवाण होते त्याच क्षणी पाक आर्मीचे लोक रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर आणि इनायत मसी यांना अटक करतात.

या घटनेनंतर टॉर्चरचं जे पर्व सुरु होतं त्यासाठी शब्द नाहीत. नबी अहमद शाकीर आता पाक आर्मीसाठी रवींद्र कौशिक झालेले असतात.

दरम्यान रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर यांच्या बायकोला, अमानतलाही ही बातमी समजते. ती सियालकोटच्या जेलमध्ये आपला नवरा नबी अहमद शाकीर आता रवींद्र कौशिक याला भेटायला येते छोट्या अरिबला घेऊन. यावेळी त्या दोघांतील संवाद काय झाला असावा याची कल्पना करावी ती काय…?? या भेटीनंतर रवींद्र कौशिक १६ वर्षे पाकच्या जेलमध्ये होते, पण ती पुन्हा एकदाही भेटायला आली नाही. रवींद्र कौशिक यांनी एका पत्रात लिहिलंय की, “मेरी वजह से एक लडकी की जिंदगी हराम हो गई”.

असहाय्य टॉर्चर

रवींद्र कौशिक यांनी कुठली माहिती भारताला पुरवली यासाठी असहाय्य टॉर्चरबरोबर पाक पोलीस, आर्मी पाकिस्तानी कोर्टात गुप्तहेरगिरीचा खटला दाखल करते. इकडे रवींद्र कौशिक यांना भारताकडून मदतीची आस लागते. पण भारत सरकार सहाय्य करण्यात असहाय्य असतं. पाकशी असलेले संबंध, सीमेवरती कायमची युद्ध परिस्थिती याचा हा परिपाक असावा. अर्थात सरकारही यासंबंधी कमी पडलं का असा प्रश्न उपस्थित होतो. काही वर्ष खटला चालल्यानंतर हायकोर्ट फाशीची शिक्षा सुनावतं जी नंतर सुप्रीम कोर्टात आजीवन कारावासात बदलली जाते.

रवींद्र कौशिक यांनी नंतर आपल्या खऱ्या घरी पाठवलेल्या पत्रात सरकारच्या प्रयत्नांबद्दल तीव्र नाराजी आणि खंत व्यक्त केली होती. एक दिवस संधी मिळाल्यानंतर रवींद्र कौशिक उर्दूमधून पाठवलेल्या पत्रातून आपण दुबईत नसून पाकमध्ये पकडलं गेल्याचं पहिल्यांदाच घरी कळवतात. पण दुर्दैवानं ते पत्र वडिलांच्या हातात पडल्यानंतर धक्क्यानं त्यांचा जागीच मृत्यू होतो, कौशिक यांच्या घरात उर्दू फक्त वडिलांनाच कळत असतं.

काही दिवसांनी घरातल्यांना पत्र सापडतं त्यातील मायना जाणून घेतल्यानंतर घरातल्यांना धक्का बसतो आणि सरकारकडे पाठपुरावा सुरु होतो. वर्ष उलटत असतात दरम्यान पाकच्या जेलमध्ये टॉर्चर आणि शारिरीक हेळसांड यामुळे रवींद्र कौशिक यांची तब्येत खालावते, त्यांना टी.बी.ची लागण होते. घरातले खूप प्रयत्न करतात पण उपयोग होत नाही.

टीबीने आजारानं मृत्यू

बघता-बघता १६ वर्ष उलटतात आणि २००१ च्या नोव्हेंबरमध्ये रवींद्र कौशिक यांचा टी.बी.च्या आजारानं मृत्यू होतो. मृत्यूच्या तीन दिवस आधी रवींद्र कौशिक यांनी लिहिलेल्या पत्रात पुन्हा खंत व्यक्त केली. पाकमधल्या मुलतान जेलमध्येच मग रवींद्र कौशिक उर्फ नबी अहमद शाकीर यांना दफन केलं गेलं. पण जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत त्यांनी पाक आर्मी, पोलीस यांना कोणतीही माहिती दिली नाही. शेवटपर्यंत हालअपेष्टांची परिसीमा सोसलेल्या रवींद्र कौशिक यांची देशभक्ती पाकच्या अंधारकोठडीतही तेजानं तेवत होती.

ब्लॅक टायगर

तत्कालिन पंतप्रधान इंदिर गांधी यांनी रवींद्र कौशिक यांचा उल्लेख “ब्लॅक टायगर” असा करुन गौरवलं होतं. पण इतक्या अनेक वर्षांत या टायगरसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न कमी पडले का??

रवींद्र कौशिक यांची रॉ च्या लोकांशी पहिली गाठ पडली ती एका देशभक्तीच्या नाटकाच्या शो नंतर. एक भारतीय फौजी चीनच्या ताब्यात सापडतो आणि हालअपेष्टा सोसतो अशा विषयाच्या नाटकात रवींद्र कौशिक यांनी फौजीची भूमिका त्यावेळी साकारली होती. रंगमंचावरती साकारलेली भूमिका रवींद्र कौशिक यांच्या वास्तविक जीवनात चपखल बसली…..दुर्दैव….!!

हा लेख लिहिताना अनेकदा रवींद्र कौशिक यांनी देशासाठी सोसलेल्या हाल-अपेष्टांची जाणीव झाली आणि उर भरुन आला. देशासाठी सर्वस्व त्यागलेल्या या महान देशभक्ताला सलाम.

(लेखात व्यक्त केलेलं मत लेखकाचं वैयक्तीक आहे. सदरचा लेख इंटरनेटवरील माहिती आणि यूट्यूबवरील टी.व्ही. शो पाहून लिहिलेला आहे.)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें