माझ्याविरोधात वाद पेटवणारा मास्टरमाइंड तेव्हा सभागृहात नव्हता, अजित पवारांचा रोख कुणाकडे?
मी सभागृहात बोललो तेव्हा कुणी काही बोलला नाही. कारण त्यांनाही ते पटलेलं होतं. पण ही क्लृप्ती लढवणारा मास्टरमाइंड तिथे नव्हता,असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

मुंबईः छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) हे स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर (Dharmaveer) नव्हते या वक्तव्यावर अजित पवार यांनी आज स्पष्टीकरण दिलं. किंबहुना पुराव्यानिशी त्यांनी आपला मुद्दा लावून धरला. मी कोणतीही चूक किंवा गुन्हा केलेला नाही. त्यामुळे माफी मागण्याचं कारण नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासोबतच आपल्याविरोधात एवढं रान का पेटवलं गेलं, यामागील हेतू काय आहे, हेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं. मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. राज्यपाल, भाजपचे मंत्री, प्रवक्ता यांनी केलेलं आहे. मी आजही माझ्या विधानाशी ठाम आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, मी सभागृहात मी हा विषय मांडला. त्यानंतर दोन दिवसानंतर विरोध व्हायला सुरुवात झाली. असं का? विचारल्यावर अजित पवारांनी शंका व्यक्त केली.
मी बोललो तेव्हा त्यांचा मास्टरमाइंड तेव्हा सभागृहात नव्हता. त्यांचा एक ग्रुप आहे. तो विचार करतो. कोणता मुद्दा काढायचा हे तिथं ठरतं.
जनतेचं लक्ष कसं विचलित करायचं? त्यासाठी ही संधी आहे, हे शोधलं जातं. त्यानंतर प्रतिक्रिया उमटतात. आंदोलनं केली जातात, माझ्याविरोधातील आंदोलन, असाच प्रकार असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
मी सभागृहात बोललो तेव्हा कुणी काही बोलला नाही. कारण त्यांनाही ते पटलेलं होतं. पण ही क्लृप्ती लढवणारा मास्टरमाइंड तिथे नव्हता.
त्यांच्या कल्पनेतून हे आदेश निघाले. त्यांना विरोध करा. आंदोलन करा. मोर्चे काढा. त्यांच्या प्रतिमेला चपलेने मारा असे म्हटलं गेलं असेल… यातला मास्टरमाइंड या शब्दावरून आता चर्चा सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमीपूजन लोकप्रिय पंतप्रधानांच्या हस्ते झालं. मात्र त्याचं पुढे काही झालं नाही. ७५ वर्षांच्या काळात आम्ही विचार केला, तो भाजपला आवडला नाही, म्हणून त्यांनी ही नवीन टूम काढली, अशी मला शंका येते, असं अजित पवार म्हणाले.
