अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला का? अमित शाह म्हणतात…

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार किंवा शरद पवार यांनी नाही, तर शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, असं अमित शाह म्हणाले.

अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला का? अमित शाह म्हणतात...

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने ‘महाविकास आघाडी’ स्थापन करण्याच्या शिवसेनेने घेतलेल्या निर्णयावर भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तिन्ही पक्षांमध्ये समान विचारधारा नसून “सत्तेची लालसा” आहे, असं शाह म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाही, तर शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, असं शाह (Amit Shah on Ajit Pawar) म्हणाले.

अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय चुकीचा होता, की गणितं चुकली, असा प्रश्न अमित शाहांना झारखंडमध्ये एका वृत्तवाहिनीने विचारला. त्यावर, हा निर्णय चूक की बरोबर असं सांगता येणार नसल्याचं ते म्हणाले. अजित पवार किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्हे, तर शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी नेहमीच आमच्याविरुद्ध लढा देत आली आहे, पण शिवसेनेने आमच्याशी विश्वासघात केला आहे, असं अमित शाह म्हणाले.

नजीकच्या भविष्यात शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत, असंही अमित शाहांनी स्पष्टपणे म्हटलं नाही. “जेव्हा असा विश्वासघात होतो तेव्हा एखाद्याला राग येणं स्वाभाविक आहे. मात्र यापुढे मला याविषयावर आणखी काही बोलणं योग्य वाटत नाही, असं म्हणत अमित शाहांनी पूर्णविराम दिला.

“महाराष्ट्रात काय घडलं, हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे. जेव्हा आम्ही निवडणूक लढवली, तेव्हा भाजप आणि शिवसेना युतीमध्ये होते आणि जनादेश भाजपकडे होता. निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना वेगवेगळ्या मागण्या घेऊन आली, असा दावा अमित शाहांनी केला.

देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, ठाकरे सरकारवर 24 तासात दुसरा हल्ला

युती पुन्हा सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रिपदी राहतील, हे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनेक सभांमध्ये स्पष्ट करण्यात आल्याचं सांगत अमित शाहांनी शिवसेनेचे दावे फेटाळले.

‘भाजपने कधीच घोडेबाजार केला नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही. उलट घोडेबाजार करणारा पक्ष काँग्रेसच आहे. त्यांनी तर अख्खा तबेलाच खरेदी केला” असा घणाघातही शाहांनी (Amit Shah on Ajit Pawar) केला.

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांशी हातमिळवणी करत 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांनी बंड करत आपल्याकडे आमदारांचं संख्याबळ असल्याचं दाखवल्याने फडणवीस सरकारने सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र राष्ट्रवादीला अजित पवारांची मनधरणी करण्यात यश आल्यामुळे त्यांनी तलवार म्यान केली. अजित पवारांनी अवघ्या तीनच दिवसांत म्हणजेच 26 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकारकडे बहुमत उरलं नाही आणि भाजप सरकार कोसळलं.