संजय राऊत यांनी कमी बोलावं अशीच आमची अपेक्षा : आशिष शेलार

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar meet Sanjay Raut) यांनी आज लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्याच्या राजकीय तणातणीत भाजप आणि शिवसेनेमधील संबंध ताणले आहेत.

संजय राऊत यांनी कमी बोलावं अशीच आमची अपेक्षा : आशिष शेलार

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar meet Sanjay Raut) यांनी आज लीलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्याच्या राजकीय तणातणीत भाजप आणि शिवसेनेमधील संबंध ताणले आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे बडे नेते असलेले आशिष शेलार (Ashish Shelar meet Sanjay Raut)  हे संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याने, चर्चेला उधाण आलं. आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केलीच, शिवाय दोघांनी विशेष कक्षात जाऊन दहा मिनिटे चर्चाही केली.

सध्या शिवसेना सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. राज्यपालांना भेटून शिवसेनेने वेळही वाढवून मागितला आहे. मात्र राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने सेनेची कोंडी झाली आहे.

अशा परिस्थितीत भाजपकडून पुन्हा शिवसेनेशी संपर्क सुरु आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आशिष शेलार हे काही निरोप घेऊन आले होते का अशीही चर्चा आहे.

आशिष शेलार यांना याबाबत विचारलं असता, ते म्हणाले, “आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आपले वैचारिक मतभेद असोत की  नाही, एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस करणे ही आपली संस्कृती आहे. शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा नाही. किंबहुना त्यांनी कमी बोलावं अशीच आमची अपेक्षा आहे, त्यांची प्रकृती नीट राहील, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मी  त्यांची विचारपूस केली. भाजपचे पदाधिकारी प्रताप आशरही याच रुग्णालयात अॅडमिट आहेत,त्यांचीही भेट घेतली. यात कोणतीही राजकीय चर्चा नाही”

10 मिनिटे विशेष कक्षात चर्चा

दरम्यान, आशिष शेलार हे कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही असं म्हटलं असलं तरी, संजय राऊतांसोबत त्यांनी विशेष कक्षात नेमकी कोणती चर्चा केली असावी याचा अंदाज बांधता येऊ शकतो.

दरम्यान, आशिष शेलार रुग्णालयात आले त्यावेळी संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकरही उपस्थित होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *