बीडमध्ये राष्ट्रवादीच्या सभेनंतर कोयत्याने हल्ला, वैयक्तिक वादातून प्रकार

बीडमध्ये राष्ट्रवादीच्या सभेनंतर कोयत्याने हल्ला, वैयक्तिक वादातून प्रकार
प्रातिनिधिक फोटो

बीड : निवडणुकीच्या धामधुमीत बीडमध्ये प्रचाराला हिंसक वळण लागलंय. बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील धर्माळा इथे राष्ट्रवादीची सभा संपल्यानंतर कोयत्याने तोडफोड करण्यात आली. वैयक्तिक वादातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी धारुर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली आहे.

बीडचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या सारिका सोनवणे यांची सभा होती. या सभेनंतर लगेचच हा प्रकार घडला. सारिका सोनवणे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अगोदर करण्यात आला. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि सरपंच वैजिनाथ सोळंके यांच्यासोबत असलेल्या वैयक्तिक वादातून गणेश कदम या तरुणाने सभेपासून बाजूला हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सारिका सोनवणे यांची प्रचार सभा चालू असताना सभेच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या वैजिनाथ भैरू सोळंके या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला याच गावातील तरुणाने तोडण्याच्या कोयत्याने मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय. यात वैजिनाथ सोळंके यांच्या हाताला मार लागला. शिवाय या हल्लेखोर तरुणाने कोयत्याने चार ते पाच दुचाकींवर वार करून नासधूस केली, असंही राष्ट्रवादीचं म्हणणं आहे.

सरपंच असलेल्या वैजिनाथ सोनवणे आणि गणेश कदम यांचं वैर आहे. दोघेही एकाच गावातले आहेत. सभेनंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचं रुपांतर हल्ल्यामध्ये झालं. सारिका सोनवणे या हल्ल्याच्या स्थळापासून दूर होत्या, अशीही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ही गुंडगिरी असल्याचं म्हणत घटनेचा निषेध केलाय. गुंडांनी सारिका सोनवणे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप धनंजय मुंडेंनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI