उमेदवार 34, मतं फक्त दोघांनाच, तब्बल 32 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

उमेदवार 34, मतं फक्त दोघांनाच, तब्बल 32 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 10 हजार, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 हजार डिपॉझिट जमा करावे लागतात. तब्बल 32 जणांचे डिपॉझिट जप्त झाल्यामुळे निवडणूक अयोगाला दोन ते अडीच लाखांचा फायदा झाला आहे.

Nupur Chilkulwar

|

Oct 26, 2019 | 5:10 PM

औरंगाबाद : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेत्यांनी वेगवेगळे विक्रम केले. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्व विधानसभा मतदारसंघात डिपॉझिट जप्त झाल्याचा विक्रम झाला आहे (Aurangabad Deposit Confiscated). औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात 34 पैकी तब्बल 32 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणारा हा राज्यातला पहिला मतदारसंघ असावं (Aurangabad Deposit Confiscated).

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 34 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, या मतदार संघातील मतदारांनी इतर 32 उमेदवारांना सपशेलपणे नाकारत फक्त दोन उमेदवारांच्या पारड्यात मतांचं दान टाकलं. त्यामुळे या मतदारसंघात तब्बल 32 उमेदरवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अतूल सावे हे विजयी झालेले आहेत. त्यांची लढत एमआयएमच्या गफार कादरी यांच्यासोबत होती. या मतदारसंघात हिंदू-मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक धार्मिक मुद्यांवर केंद्रीत झालेली पाहायला मिळाली. या मतदारसंघातील मुस्लिमांची मतं ही एमआयएमच्या पारड्यात पडली, तर हिंदूंची मतं भाजपच्या पारड्यात पडली. या मतदारसंघात हिंदू आणि मुस्लिमांची संख्या तुल्यबळ असल्यामुळे कुणाचा आमदार होणार याबाबत चुरस होती. सरते शेवटी अतूल सावे यांचा विजय झाला. मात्र, या दोन्ही उमेदवारांनी आपापल्या मतदारांची मतं खेचल्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं आणि या मतदारसंघातून नशीब अजमावणाऱ्या इतर उमेदवारांना रिकाम्या हाताने घरी परतावं लागलं.

औरंगबाद पूर्व मतदारसंघात एकूण 3 लाख 19 हजार मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 94 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यापैकी 93,966 मतं अतूल सावे यांना मिळाली, तर 80,036 मतं गफार कादरी यांनी घेतली. या दोन्ही उमेदवारांनी सर्वाधिक मतं घेतल्यामुळे इतर उमेदरांसाठी मतंच शिल्लक राहिली नाहीत. त्यामुळे तब्बल 32 जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 10 हजार, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 हजार डिपॉझिट जमा करावे लागतात. तब्बल 32 जणांचे डिपॉझिट जप्त झाल्यामुळे निवडणूक अयोगाला दोन ते अडीच लाखांचा फायदा झाला आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें