शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही : बाळा नांदगावकर

शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही : बाळा नांदगावकर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आश्वासन देऊनही वाढीव वीजबिल रद्द करण्याचा निर्णय झाला नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते, बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली.

भीमराव गवळी

|

Nov 19, 2020 | 4:12 PM

मुंबई: वाढीव वीजबिल माफ करावं म्हणून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पवारांना निवेदनही दिलं. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करतो म्हणून आश्वासनही दिलं. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली. (bala nandgaonkar taunt sharad pawar over electricity bill issue)

बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाढीव वीजबिला विरोधात मनसेच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील जनतेला वाढीव बिलाचा शॉक बसल्यानंतर मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांना भेटले, त्याशिवाय ऊर्जा सचिव, बीएमसी अधिकाऱ्यांना भेटले. अदाणी ग्रुपचे अधिकारी राज ठाकरेंना भेटले. राज ठाकरे स्वत: राज्यपालांना भेटले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना भेटण्यास सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे हे शरद पवारांशी बोलले. पवारांनी राज ठाकरेंकडून निवेदनं मागवली. आम्ही ही निवेदनं दिली. तरीही त्यावर निर्णय घेतला गेला नाही. आता तर वीजबिल माफ करणार नसल्याचं ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला विश्वास आहे, पवारसाहेबांचा… कारण राज ठाकरे बोलल्यानंतर पवारसाहेब म्हणाले होते, राज्य सरकारशी बोलतो. पण मला वाटतं पवारसाहेबांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरलेली नाही, असं नांदगावकर म्हणाले.

पवारसाहेब तुमचं आणि राज साहेबांचं बोलणं झाले आहे. या सरकारचे सर्वेसर्वा तुम्ही आहात. आज कॅबिनेटची मीटिंग होणार आहे. त्यामुळे तुमचा आदेश द्या आणि राज्यातील साडे अकरा कोटी लोकांना दिलासा द्या, असं सांगतानाच श्रेयवादाची लढाई न करता सरकारने निर्णय घ्यावा, लोकांचं वीजबिलं माफ करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले. सरकारने वाढीव बील माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांना निवेदनं दिली. पण वीजबिल माफ झाली नाही. उलट ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवून महाराष्ट्राचा घोर अपमान केला. त्यामुळे राज्यातील जनतेची फसवणूक झाली असून जनतेत संतापाची भावना आहे. त्यामुळे आम्ही सरकारला येत्या सोमवारपर्यंत वीजबिल माफ करण्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर वीजबिल माफ नाही केलं तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात उग्र आंदोलनं होतील. लोकांचा संयम सुटला आहे. पब्लिक क्राय झाल्यास त्याला जबाबदार सरकारच असेल, असं सांगतानाच कुणाची वीज कापल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (bala nandgaonkar taunt sharad pawar over electricity bill issue)

संबंधित बातम्या:

‘बीएमसी’ निवडणुकीत शिवसेनेशी युती नको, काँग्रेस स्वबळावर : रवी राजा

केडीएमसी घंटागाडी 5 कर्मचाऱ्यांना मारहाण, काम बंद आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग

राज ठाकरेंच्या वीजबिल माफीच्या आंदोलनात भाजपही; बावनकुळेंचं मोठं विधान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें