बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्या’ दोन कृती, ज्यामुळे शिवसेनेने पुढे इतिहास घडविला

महेश पवार

Updated on: Jan 23, 2023 | 3:54 PM

1966 साली दादर येथील कदम मेन्शनच्या व्हरांड्यातुन शिवसेनेचा प्रवास सुरु झाला. अनेक नेत्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केलं, बंड केलं पण सामान्य शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कायम राहिला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या 'त्या' दोन कृती, ज्यामुळे शिवसेनेने पुढे इतिहास घडविला
SHIVSENA CHIF BALASAHEB THACKAREY
Image Credit source: TV9 NETWORK

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde ) यांनी केलेलं बंड ( उठाव ) यामुळे उद्धव ठाकरे ( uddhav thackrey ) यांचे शिवसेना ( shivsena ) पक्षप्रमुखपद धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाची चाहूल लागताच मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. तुम्ही मुख्यमंत्री व्हा. याशिवाय मी जर पक्षप्रमुख म्हणून नको असेल तर त्याचाही राजीनामा देतो असे जाहीर केले. यामुळे वातावरण पलटले. महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या सहानभुतीची भिंत उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहिली. पण, त्याचे पक्षप्रमुख पद वाचवू शकली नाही. निवडणूक आयोगासमोर अद्यापही शिवसेना, धनुष्यबाण आणि उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद यावर निर्णय झालेला नाही. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती अगदी त्याचप्रमाणे दस्तुरखुद्द हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ( balasaheb thackarey ) यांनी एकदा नाही तर दोनदा ‘शिवसेनाप्रमुख’ पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पण, त्यामुळे संकटकाळातही शिवसेना तावून सुलाखून बाहेर पडली आणि पुढे मोठ्या जोमाने वाढली. काय झाले होते नेमकं त्यावेळी?

बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे समीकरण महाराष्ट्राला काही नवं नाही. 1966 साली दादर येथील कदम मेन्शनच्या व्हरांड्यातुन शिवसेनेचा प्रवास सुरु झाला. अनेक नेत्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केलं, बंड केलं पण सामान्य शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कायम राहिला. पण, अशा दोन घटना घडल्या होत्या की ज्याचा बाळासाहेबांना मानसिक त्रास झाला होता. त्याने ते संतप्त झाले होते आणि त्यांनी शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते.

निवडणुकीत पराभव आणि बाळासाहेबांचा राजीनामा

1978 मध्ये विधानसभा निवडणुक शिवसेनेने लढविली. पण सेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. त्या आणीबाणीला बाळासाहेबांनी अघोषित समर्थ दिले होते. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला. केंद्रात इंदिरा गांधी यांचा तर इथे महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव झाला. यातच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. 1973 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 40 नगरसेवक निवडून आले होते. पण, विधानसभेत झालेली वाताहत लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांनी ही निवडणूक हरलो तर शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देईन असे जाहीर करत शिवसैनिकांच्या अंगात अंगार फुलवला होता. पण, 1978 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला फक्त 22 जागा मिळाल्या. परिणामी महापालिकेतील सत्ता गेली.

बाळासाहेबांचा संताप अनावर झाला. काही दिवसांनी शिवसेनेची सभा झाली. त्या सभेत त्यांनी शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. असंख्य शिवसैनिकांनी बाळासाहेबांची मनधरणी केली. काहींनी तर तुम्ही जाल तर आमच्या प्रेतावरून असा आकांत मांडला. पण, बाळासाहेब ठाम होते. अखेर, शिवसैनिकांनी महापालिकेतील भगवा कधीच खाली पडू दिला जाणार नाही अशी प्रतिज्ञा केली तेव्हाच बाळासाहेब शांत झाले. त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला.

त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 1985 साली झालेल्या निवडणुकीत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला शब्द शिवसैनिकांनी पाळला. 1985 साली शिवसेनेचा महापौर म्हणून छगन भुजबळ विराजमान झाले. त्यानंतर दत्ता नलावडे, रमेश प्रभू, सी. एस. पडवळ, शरद आचार्य, दिवाकर रावते, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, नंदू साटम, हरेश्वर पाटील, महादेव देवळे, दत्ता दळवी, शुभा राऊळ, श्रद्धा जाधव, सुनील प्रभू, स्नेहल आंबेकर, विश्वनाथ महाडेश्वर ते आताच्या किशोरी पेडणेकर असे महापौर होऊन शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकेची सत्ता अबाधित राहिली ती केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या पहिल्या राजीनाम्यामुळेच.

घराणेशाहीचा आरोप आणि दुसरा राजीनामा

मुंबई, ठाणे महापालिकेत मिळणारे यश यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा नामांतर, महागाई, सत्ताधारी यांच्याविरोधात रान पेटवले. बाळासाहेबांची शिवसेना गावखेड्यात पोहोचली. 1985 नंतर बाळासाहेब यांचा पुतण्या राज ठाकरे यांचा शिवसेनेत दबदबा वाढला. बाळासाहेब यांचे प्रतिरूप म्हणून राज ठाकरे पुढे येत होते. 1988 साली भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख त्यांची नियुक्ती झाली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचाही पक्षात चंचुप्रवेश झाला होता. संघटनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब यांच्यासोबत असेलेले नेते यांच्यात चुळबुळ सुरु झाली. 1991 साली भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि त्याचा वापर या नेत्यांनी करून घेतला.

बळवंत मंत्री, माधव देशपांडे, श्याम देशमुख, भाई शिंगरे हे स्थापनेपासूनचे शिवसैनिक त्यात सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी, छगन भुजबळ यांची भर पडली. यातील माधव देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. अख्खी हयात घराणेशाही विरुद्ध लढण्यात घालवली. त्याच शिवसेनेत घराणेशाही आणली जात आहे. पुत्र आणि पुतण्याच्या नादी लागून शिवसैनिकांनी निष्ठेने उभ्या केलेल्या संघटनेचा नाश ठाकरे करत आहेत असा जाहीर आरोप केला. बाळासाहेबांना हा आरोप सहन झाला नाही.

शिवसैनिकांना धक्का

19 जुलैचा तो दिवस. सामनाचा अग्रलेख झळकला. शिवसेना ही आमची किंवा आमच्या कुटुंबाची खाजगी मालमत्ता नाही. तुमचा निरोप घेताना मनास असंख्य यातना डसत आहेत. डोळे पाण्याने डबडबले असले तरी आमच्या मनोदेवतेचा हाच ‘कौल’ आहे. प्राप्त परिस्थितीत तो अपरिहार्य आहे. शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यात म्हटले होते. हा सर्व शिवसैनिकांना मोठा धक्का होता. मुंबईत माधव देशपांडे यांच्याविरोधात वातावरण तापले.

धो धो पावसातही हजारो शिवसैनिक मातोश्री बाहेर जमा झाले. शिवसेनाप्रमुख ही पदवी या शिवसैनिकांनीच त्यांना दिली होती. त्या शिवसैनिकांच्या आर्त हाकेला बाळासाहेबांनी प्रतिसाद दिला. विस्तव म्हणून वागणार आहेत काय? जर तसे असेल तरच केवळ मर्द शिवसैनिकांचे नेतृत्व आपण करू. जे नामर्द आहेत असतील त्यांनी शिवसेनेतून चालते व्हावे, असा इशाराच त्यांनी पक्षांतगर्त विरोधकांना दिला होता शिवाय शिवसेनेचा रिमोट कंट्रोल आपल्याच हाती कायम राहणार हा संदेश देण्यात ते यशस्वी झाले.

हे सुद्धा वाचा

बाळासाहेब यांना शिवसेनाप्रमुख, उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख आणि आदित्य ठाकरे यांना युवासेनाप्रमुख म्हणून शिवसैनिकांनी मान्यता दिली. जरी अन्य विरोधक ठाकरे घराण्यावर घराणेशाहीचा आरोप करत असले तरी शिवसैनिक मात्र या घराणेशाहीवरच प्रेम करत आले आहेत हे सत्य नाकारता येत नाही हे हि तितकेच खरे आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI