सेना-भाजपमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता, पण… : चंद्रकांत पाटील

सेना-भाजपमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता, पण... : चंद्रकांत पाटील

शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरलं होतं, मात्र आता आमचे विद्यमान आमदारच 132 आहेत, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे सेना-भाजप युतीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनिश बेंद्रे

|

Aug 26, 2019 | 11:56 AM

मुंबई : शिवसेना-भाजप युतीमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता, मात्र आता आमचे विद्यमान आमदारच 132 आहेत… असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जागावाटपावरुन सेना-भाजपमध्ये ओढाताण होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटलांनी एकप्रकारे युतीमध्ये फूट पडण्याचे संकेत दिल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी 18 जागा मित्रपक्षांना सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरलं होतं, मात्र आता आमचे विद्यमान आमदारच 132 आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेनेला या परिस्थितीची जाणीव असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे ‘जागा कमी उमेदवार फार’ अशी अपरिहार्यता दाखवत दोन्ही पक्ष युती तोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांसोबतच आयारामांना तिकीट देण्याची तजवीजही भाजपला करावी लागणार आहे. परंतु सर्वांना खुश करण्यासाठी तितक्या जागाच नसतील, तर काय करायचं, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी युती तोडण्याचा मार्ग काढला जाऊ शकतो.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘आमचं ठरलं आहे’ असं म्हणत युतीबाबत मौन बाळगताना दिसले आहेत. विधानसभा निवडणुकीला युती सामोरी जाणार असल्याचं शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) या दोन्ही पक्षांचे नेते निक्षून सांगत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळाची तयारी सुरु केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या (Maharashtra Assembly Election) सर्व 288 मतदारसंघांची चाचपणी भाजपने सुरु केल्याची माहिती आहे.

भाजपने 288 विधानसभा मतदारसंघात आपले प्रतिनिधी पाठवले आहेत. या मतदारसंघांमधील इच्छुकांची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघातील संभाव्य उमेदवार कोण असू शकतो, त्या मतदारसंघात कोण प्रबळ दावेदार आहे, याची चाचपणी करत असल्याची कबुली भाजप आमदार गिरीश व्यास यांनी दिली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें