ऐतिहासिक! मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र आषाढीची पूजा करणार

यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही विठ्ठलाची पूजा करताना दिसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पंढरपूरच्या दर्शनासाठी ते सर्व खासदारांनाही घेऊन जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऐतिहासिक! मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र आषाढीची पूजा करणार

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा आहे. मात्र यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही विठ्ठलाची पूजा करताना दिसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच यावेळी ते शिवसेनेच्या 18 विजयी खासदारांनाही आपल्यासोबत पंढरपूरला घेऊन जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांसोबत अयोध्या वारी केली होती. त्याशिवाय उद्धव ठाकरेंनी खासदारांसह कोल्हापूरच्या अंबाबाईचेही दर्शन घेतले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरमध्ये जाणार आहे. विशेष म्हणजे पंढरपूरच्या दर्शनासाठी ते सर्व खासदारांनाही घेऊन जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी विशेष नियोजनही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं पंढरपूरात महासभा घेत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं होते. त्यानंतर आता येत्या विधानसभा निवडणुकीत विठ्ठलाचे दर्शन घेऊन भाजप-शिवसेना निवडणुकीला सामोरी जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या वारी दरम्यान दिल्लीत अधिवेशन सुरु होते. त्यामुळे त्यांना काही खासदारांना दिल्लीत घेऊन जाता आले नव्हते. मात्र आता आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्व खासदारांना घेऊन विठ्ठल रखुमाईची महापूजा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान पांडुरंगाचे दर्शन मिळावे म्हणून आधीच वारकरी 36 ते 48 तास दर्शनाच्या रांगेत उभे असतात. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पूजेमुळे आधीच दर्शनाची रांग 2 तास थांबवली जाते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस,  उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत सर्व खासदार असणार आहेत. या सर्वांचे दर्शन व्हीआयपी रांगेतून होणार असल्याने वारकऱ्यांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

गेल्यावर्षी मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाची पूजा करता आली नव्हती. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करु देणार नाही असा पावित्रा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी घेतला होता. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पूजा रद्द करण्यात आली होती. मात्र आता मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा महापूजेचा मान देण्यात येणार आहे. मात्र त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार जातात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *