BREAKING – भाजप आणि काँग्रेसच्याही भेटी, काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल नितीन गडकरींच्या घरी

सचिन पाटील

|

Updated on: Nov 06, 2019 | 10:48 AM

देशाच्या राजकारणात काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले अहमद पटेल (Ahmed Patel meet Nitin Gadkari) हे चक्क भाजप नेते नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचले आहेत.

BREAKING - भाजप आणि काँग्रेसच्याही भेटी, काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल नितीन गडकरींच्या घरी

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्यांवरुन घमासान सुरु असताना, राजधानी दिल्लीत वेगळ्याच आणि अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. कारण देशाच्या राजकारणात काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले अहमद पटेल (Ahmed Patel meet Nitin Gadkari) हे चक्क भाजप नेते नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबतच भाजप (Ahmed Patel meet Nitin Gadkari) आणि काँग्रेसच्या या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा होत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले अहमद पटेल हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज सकाळी दाखल झाले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर या दोघांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  नितीन गडकरी यांना मध्यस्थी करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही जबाबदारी गडकरींवर सोपवली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाऊन गडकरी आणि अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

अहमद पटेल यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, अहमद पटेल यांनी या भेटीबाबात स्पष्टीकरण देताना महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर कुठलीही चर्चा झाली नाही. देशात अपघात होत आहे, यावर माहिती देण्यासाठी आलो होतो, असं म्हटलं.

कोण आहेत अहमद पटेल?

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि सल्लागार आहेत. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली आहे. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना आहे.

जेव्हा पक्षहिताचा प्रश्न येतो, तेव्हा सोनिया गांधी या राहुल गांधींपेक्षाही अहमद पटेल यांच्यावर अवलंबून असतात असं म्हटलं जातं. अहमद पटेल हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून पक्षात आहेत. 1977 मध्ये काँग्रेस तोंडघशी पडलेली असताना संसदेत पोहचणाऱ्या मोजक्या काँग्रेस खासदारांमध्ये अहमद पटेल यांचा समावेश होतो.

1980 मध्ये काँग्रेसने पुनरागमन केलं, तेव्हा इंदिरा गांधींनी अहमद पटेलांना कॅबिनेट मंत्रिपद ऑफर केलं, मात्र पटेल यांनी पक्षबांधणीला प्राथमिकता दिली होती.

अहमद पटेल हे तीन वेळा लोकसभेवर, तर चार वेळा राज्यसभेवर खासदारपदी निवडून आले आहेत.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 13 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

सत्तास्थापनेचं गणित

भाजपने 105 जागांसह (Independent MLA Shankarrao Gadakh support  Shiv Sena) सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.

अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचून संख्याबळ वाढवण्याचा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI