कामचुकारांना दोन सुट्ट्यांचं बक्षीस कशाला? काँग्रेस नेत्याची ठाकरे सरकारवर टीका

राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा सप्ताह करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय मूर्खपणाचा आहे, असं ट्वीट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलं आहे

कामचुकारांना दोन सुट्ट्यांचं बक्षीस कशाला? काँग्रेस नेत्याची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : पाच दिवसांचा आठवडा जाहीर करुन ठाकरे सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ‘गुड न्यूज’ दिली खरी,
मात्र सत्ताधारी महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्याकडूनच विरोध होताना दिसत आहे. पाच दिवस आठवड्याचा निर्णय निर्बुद्धपणाचा असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी (Congress Leader on Five Days Week) केली आहे.

‘राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा सप्ताह करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय मूर्खपणाचा आहे.
दर आठवड्याला दोन सुट्ट्या घेण्यात काय अर्थ आहे? सरकारी कर्मचारी आळशीपणासाठी आधीच कुप्रसिद्ध आहेत. आपण त्यांच्या कामचुकारपणासाठी त्यांना बक्षीस देत आहोत का?’ असा प्रश्न संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.

संजय निरुपम यांनी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीला घरचा आहेर देण्याची परंपरा पाळली आहे. शिवसेनेसोबत जाणं आत्मघातकी आहे, असा सल्ला संजय निरुपम यांनी सत्तास्थापनेपूर्वी दिला होता. शिवसेनेशी फ्लर्ट करण्यात अर्थ नाही, असंही संजय निरुपम यांनी सुनावलं होतं.

पाच दिवसांचा आठवडा

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठं गिफ्ट दिलं. पुढील महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल (12 फेब्रुवारी) हा मोठा निर्णय घेण्यात आला.

29 फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या कामाची दररोज 45 मिनिटं वाढवली जातील. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता दर शनिवार-रविवार हक्काची सुट्टी मिळणार आहे. सध्या प्रत्येक रविवारशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच कर्मचाऱ्यांना सुट्टी असते.

गेल्या अनेक वर्षांपासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी प्रलंबित होती. राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असल्यापासून ही मागणी केली जात आहे.

Congress Leader on Five Days Week

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI