22 वर्षांनंतर ठाकरेंचं पुन्हा ‘सीमोल्लंघन’, बाळासाहेबांनंतर नातू आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत

याआधी 1999 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार उत्तम पटेल यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरे सिल्वासाला गेले होते

22 वर्षांनंतर ठाकरेंचं पुन्हा 'सीमोल्लंघन', बाळासाहेबांनंतर नातू आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत
Balasaheb Thackeray, Aditya Thackeray

मुंबई : दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी 1999 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती, जी महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची एकमेव सभा होती. त्यानंतर जवळपास 22 वर्षांनी बाळासाहेबांचा नातू प्रचारसभा घेणार आहे.

दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणूक

दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होणार आहे. अपक्ष खासदार राहिलेल्या मोहन डेलकरांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. कलाबेन यांच्या प्रचारासाठी दुपारी 12 वाजता सिल्वासातील आदिवासी भवन येथे आदित्य ठाकरे यांची जनसभा होणार आहे.

बाळासाहेबांची राज्याबाहेरील एकमेव प्रचारसभा

याआधी 1999 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार उत्तम पटेल यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरे सिल्वासाला गेले होते. महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची ती एकमेव सभा होती. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर त्यांचे नातू आदित्य ठाकरे हे सिल्वासात येत आहेत.

संजय राऊतांना विजयाचा विश्वास

आमच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद आहे. शिवसेनेचे वातावरण आहे. मोहन डेलकरांनी 9 वेळा निवडणूक लढवली, ते 7 वेळा खासदार राहिले. मोहन डेलकर यांचे वडीलही इथे खासदार होते. ते पोर्तुगिजांविरोधात लढले, असं हे कुटुंब आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

प्रचाराचा धुरळा थंडावणार

दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत महेश गावित हे भाजपचे उमेदवार आहेत. 30 ऑक्टोबरला मतदान पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून आज सायंकाळी प्रचार संपणार आहे. या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीकडे महाराष्ट्राचंही लक्ष लागलं आहे. भाजप गड जिंकणार, की डेलकरांच्या पत्नी शिवसेनेला खासदारकी मिळवून देणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

मोहन डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन! पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारीची घोषणा

दादरा नगर हवेलीत शिवसेनेचा आवाज घुमणार? डेलकरांच्या प्रचारासाठी ठाकरे भाजपच्या गडात शड्डू ठोकण्याच्या तयारीत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI