बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या शिष्टाईलाही अपयश

मुंदडा (Namita Akshay Mundada BJP) कुटुंबीयही पुन्हा भाजपात आल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे. तर केजच्या विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.

बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या शिष्टाईलाही अपयश

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केल्यानंतरही नमिता मुंदडा (Namita Akshay Mundada BJP) यांनी भाजपात प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बेरजेच्या राजकारणाला पुन्हा एकदा यश आलं. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना सोडून जाणारे नेते पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या नेतृत्त्वात भाजपात येत आहेत. मुंदडा (Namita Akshay Mundada BJP) कुटुंबीयही पुन्हा भाजपात आल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे. तर केजच्या विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या विरोधाला कंटाळून आपण भाजपात जात असल्याचं मुंदडा कुटुंबाने म्हटलं आहे. दिवंगत नेत्या विमलताई मुंदडा या दोन वेळा भाजपच्या आणि तीन वेळा राष्ट्रवादीच्या आमदार होत्या, तर नऊ वर्ष त्यांच्याकडे मंत्रीपदही होतं. शरद पवारांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. पुढे त्यांचा राजकीय वारसा मुलगा अक्षय आणि सून नमिता यांनी चालवला.

या काळात मुंदडा कुटुंबीयांना कायम दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप आहे. धनंजय मुंडेंनी कायम मुंदडा कुटुंबाला डावलल्याचा आरोप मुंदडा कुटुंबाकडून अनेकदा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी तालुकाध्यक्षांची नियुक्ती देखील पाच वर्षे रखडवल्याचं बोललं जातं. नगरपालिका असो की जिल्हा परिषद, प्रत्येक ठिकाणी मुंदडा विरुद्ध सोनवणे आणि मुंडे यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला.

या घडामोडींनंतर अक्षय मुंदडा हे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भाजपच्या संपर्कात होते. आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे 15 दिवसांपूर्वी स्वतः शरद पवार यांनी मुंदडा आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद बीड येथे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या घरी बसून मिटवला होता.

अक्षय हे पक्ष सोडतील अशी शक्यता असल्यामुळे त्यांच्यासहित पाच जणांची उमेदवारी बीडला जाहीर केली. पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. अगोदरच राज्यात गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बीड जिल्ह्यात बसलेला हा धक्का ते कसा भरून काढणार हे आगामी काळात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *