विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमतापेक्षा जास्त मताने जिंकू, मलिकांचा दावा, राज्यपाल कोश्यारींना टोला

आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केलाय.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमतापेक्षा जास्त मताने जिंकू, मलिकांचा दावा, राज्यपाल कोश्यारींना टोला
नवाब मलिक

मुंबई : आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अंतिम निर्णय होईल. मात्र, आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केलाय. माध्यमांशी बोलताना मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही टोला लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनातील तिनही विषय महत्वाचे असल्याचं एक पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. त्यावरुन मलिक यांनी राज्यपालांना टोला लगावलाय. (Nawab Malik claims victory in Election of Assembly Speaker)

विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरु असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा असं सूचित केलं आहे. मात्र विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त आहेत. तो विषयही प्रलंबित आहे. तो निकाली काढलात तर 12 आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असं सांगतानाच असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे. याची आठवणही मलिक यांनी राज्यपाल यांना आज पुन्हा एकदा करुन दिली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच. पण त्याअगोदर 12 आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा, असा विनंतीवजा आग्रह मलिक यांनी राज्यपालांना केलाय.

राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यपाल म्हणतात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ 23 जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा” असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : काँग्रेसने आता नावही फोडलं? अध्यक्षपदासाठी पुण्यातील आमदार आघाडीवर

देवेंद्र फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Nawab Malik claims victory in Election of Assembly Speaker

Published On - 4:11 pm, Wed, 30 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI