अजित पवारांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचा हा मोठा नेता अनुपस्थितीत, चर्चांना उधाण
अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमालाही शिवाजीराव आढळराव पाटील गैरहजर होते. तसेच लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमालाही अजित पवारांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
Shivajirao Adhalarao Patil Absent : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता काही नेते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर काही नेते हे पक्षांतर करणार असल्याचे बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. पुण्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा दौरा सुरु आहे. पण या दौऱ्यात शिवाजी आढळराव पाटील मात्र कुठेही दिसले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. अजित पवार हे आज पुण्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. मात्र हेच आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमालाही शिवाजीराव आढळराव पाटील गैरहजर होते. तसेच लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमालाही अजित पवारांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
पुन्हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार?
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकर दर्शनाला आले होते, तेव्हा आणि आळंदीत वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला ते सर्वात आधी उपस्थित राहिले होते. लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीत आलेले आढळराव पाटील हे अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदेंशी अधिकची जवळीक साधत असल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळेच अजित पवार शिरूर लोकसभेत आले की, आढळरावांच्या अनुपस्थितीत असल्याची चर्चा कायमच रंगताना दिसते. शिवाजीराव आढळराव पाटील हे सध्या एकनाथ शिंदेंशी जवळीक साधत असल्याने ते पुन्हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अमोल कोल्हेंकडून पराभव
दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी (26 मार्च) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.