आधी गाडीवर हल्ला, आता गोपीचंद पडळकरांवर गुन्हा, पडळकर म्हणतात, अजित पवारांना का सोडलं?

दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधी गाडीवर हल्ला, आता गोपीचंद पडळकरांवर गुन्हा, पडळकर म्हणतात, अजित पवारांना का सोडलं?
आमदार गोपीचंद पडळकर


सोलापूर : विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे अंगुलीनिर्देश केलाय. गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेकून पळ काढणाऱ्याचा फोटो समोर आलाय. दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur police files case against MLA Gopichand Padalkar)

सोलापुरात संचारबंद लागू असतानाही आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर पोलिसांनी भांदवि कलम 188, 336, 269 नुसार गुन्हा दाखल केलाय. पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर पडळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर जरुर करा. पण मग हिंमत असेल तर पुण्यात हजारोंची गर्दी जमा करणाऱ्या अजित पवारांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

सोलापुरात दुपारी 4 नंतर संचारबंदी होती. नियमांची पूर्ण काळजी घेत आम्ही घोंगडी बैठक आयोजित केली होती. मात्र ही बैठकही झाली नाही. पोलिसही तिथे उपस्थित होते. असं असूनही माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर करा. पण पुण्यात पक्षाच्या कार्यालयाचं उद्धाटन करताना हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवारांवर आधी गुन्हा दाखल करा. पंढरपुरात जयंत पाटील यांनी मोठी गर्दी जमा केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी संतप्त प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिलीय.

दगडफेक करणाऱ्यावरही गुन्हा दाखल

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या तरुणाचा फोटो समोर आलाय. अमित सुरवसे असं या तरुणाचं नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शरद पवार, रोहित पवार यांच्यासोबतचे फोटोही समोर येत आहेत. गोपीचंद पडळकर यांनीही अमित सुरवसे याचा रोहित पवारांसोबतचा फोटो ट्वीट केलाय. दरम्यान, अमित सुरवसेवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो अद्याप फरार असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या : 

माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय, मुद्यावरून गुद्द्यावर आली, पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, निलेश राणेंचा इशारा

Solapur police files case against MLA Gopichand Padalkar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI