भुजबळ तुरुंगामध्ये का गेले, ते मी बोलणार नाही : शरद पवार

भुजबळ तुरुंगामध्ये का गेले, ते मी बोलणार नाही : शरद पवार


नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपवर व्यक्तीद्वेषाचे राजकारणाचा आरोप करत निशाणा साधला. पवार म्हणाले, ‘भुजबळ तुरुंगामध्ये का गेले होते? ते मी बोलणार नाही, पण व्यक्तीद्वेषाचे राजकारण मी करत नाही.’ ते नाशिक येथे आयोजित सभेत बोलत होते.

शरद पवारांनी आपल्या भाषणात सूचकपणे भुजबळ यांच्यावर झालेली कारवाई व्यक्तीद्वेषातून झाल्याचे सांगितले. तसेच याविषयावर विस्तृतपणे बोलणेही टाळले. यावेळी त्यांनी मोदींच्या नाशिकमधील भाषणावरही सडकून टीका केली. पवार म्हणाले, ‘मोदी नाशिकला आल्यानंतर तरी किमान कर्जमाफी, कांद्याचे दर या शेतीविषयक मद्द्यांवर बोलतील असे वाटले होते. मात्र, नाशिकसारख्या शेतीच्या जिल्ह्यात येऊनही ते शेतकऱ्यांबद्दल काहीच बोलले नाही. ते का बोलले नाही? हे मोदींनी स्पष्ट करावे.’

‘मोदींच्या काळात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली’

मोदी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपशेल अपयशी ठरल्याचे सांगत पवारांनी मोदींना लक्ष्य केले. मोदींच्या काळात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली, असाही आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ‘संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. त्यावेळी नाशिकमधील फळबाग शेतकऱ्यांना आम्ही 650 कोटी रुपये दिले होते.’

‘लहानपणी खेळायचं विमानही उडवलं नाही, त्याला विमानाचं कॉन्ट्रॅक्ट’

पवारांनी राफेल मुद्द्यावर बोलताना थेट अंबानी आणि मोदींवर हल्ला चढवला. ज्या अंबानीने लहानपणी खेळायचे विमानही नाही उडवले, त्याला विमानाचे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप पवारांनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI