औरंगजेबनेही मोकळ्या वेळेत टोप्या शिवल्या, दरेकरांनी दोनवेळा टोपी काढली, जयंत पाटील हसून हसून लोटपोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्यांच्या अभिनंदन प्रस्तावादरम्यान चांगलेच चिमटे काढले. जयंत पाटील यांनी दरेकरांचं अभिनंदन कमी आणि त्यांना टोमणेच जास्त लगावले.

औरंगजेबनेही मोकळ्या वेळेत टोप्या शिवल्या, दरेकरांनी दोनवेळा टोपी काढली, जयंत पाटील हसून हसून लोटपोट

नागपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्यांच्या अभिनंदन प्रस्तावादरम्यान चांगलेच चिमटे काढले. जयंत पाटील यांनी दरेकरांचं अभिनंदन कमी आणि त्यांना टोमणेच जास्त लगावले. जयंत पाटील हे भाषणादरम्यान इतके हसत होते की, अभिनंदन प्रस्तावादरम्यान त्यांना आपलं हसू आवरता आलं नाही.

“प्रवीण दरेकर यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. प्रवीण दरेकर यांना देवेंद्र फडणवीस यांचा जिव्हाळा इतरांपेक्षा जास्त लाभला. मला थोडीशी आशा होती की प्रसाद लाड, पृथ्वीराज देशमुख या लोकांना संधी मिळेल. मात्र आता (भाजपमध्ये) ओरिजनल लोकांचे दिवस संपले आहेत” असं जयंत पाटील म्हणाले.

सुरेश धस यांनीही प्रयत्न केला असता, तर त्यांनाही संधी मिळाली असती, पण त्यांच्या लक्षात आलं नसावं की ही संधी प्राप्त करु शकतो, असं हसत हसत जयंत पाटील म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदाची ही जागा महत्वाची आहे. आम्ही 1995 साली छगन भुजबळ या जागेवर होते. विरोधी पक्षनेता किती आक्रमक होऊ शकतो हे भुजबळांनी दाखवलं. तोच मुद्दा लावून धरला तर सरकारला निर्णय बदलावे लागतात, हे भुजबळांनी 1995 ते 1999 दरम्यान दाखवलं. विरोध करायचा तर तो मुद्दे धरुन करायचा हे सुद्धा त्यांनी दाखवलं.  प्रवीण दरेकर हे आज विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसत आहेत. मला खात्री आहे, पुढचे पाच वर्ष तुम्ही चांगले काम कराल, अशी आशा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

सभागृहाचे नेते (सुभाष देसाई) हे शिवसैनिक आणि विरोधी पक्षनेतेही शिवसैनिक आहेत. मला माहिती आहे की औरंगजेब बादशाहनेही मोकळ्या वेळेत टोप्या शिवल्या होत्या, असं म्हणत जयंत पाटील खुदूखुदू हसू लागले.

आज मी त्यांचं (प्रवीण दरेकर) अभिनंदन यासाठी करतोय की त्यांनी ती टोपी घातलेली नाही. दुसऱ्यांदा त्यांच्याकडे टोपी आली, दोनदा त्यांनी काढून ठेवली, कारण आजही भाजपचा विचार त्यांनी स्वीकारलेला नाही. आणि म्हणून आजही तुम्ही आम्हाला आमचे वाटता. मी तुमचं अभिनंदन करतो. आपण ज्याठिकाणी बसलेले आहात, तिथून महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम तुम्ही कराल, या शुभेच्छा मी तुम्हाला देतो, असं म्हणत जयंत पाटील यांनी आपलं भाषण आवरतं घेतलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *