सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: कोकणात कुणाची बाजी? भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे-प्रतिदावे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींवर भाजपनं सत्ता मिळवली आहे. तर 23 ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:42 PM, 18 Jan 2021
सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: कोकणात कुणाची बाजी? भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे-प्रतिदावे

सिंधुदुर्ग : शिवसेनेचं कायम वर्चस्व राहिलेल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नेते नारायण राणे यांचंच वर्चस्व पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींवर भाजपनं सत्ता मिळवली आहे. तर 23 ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत. तर 1 ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात तर गाव पॅनलकडे 3 ग्रामपंचायती गेल्या आहेत. मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का मानला बसलाय.(BJP dominance in Sindhudurg district, Rane, Samant and Jadhav’s counter-claims)

देवगडमध्ये नितेश राणेंचं वर्चस्व कायम

देवगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. देवगड तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. तर शिवसेनेकडे 4, राष्ट्रवादीकडे 1 आणि गाव पॅनलच्या ताब्यात 1 ग्रामपंचायत गेली आहे. वैभववाडी तालुक्यातही 9 ग्रामपंचायती भाजपकडे, 4 शिवसेनेकडे गेल्या आहेत. कणकवलीत 2 शिवसेना आणि एका ग्रामपंचायतीवर भाजपनं सत्ता मिळवली आहे.

तिकडे मालवणमध्ये आमदार वैभव नाईक आणि सावंतवाडीत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. मालवणमधील 5 ग्रामपंचायती भाजपकडे, तर एका ग्रामपंचायतीवर शिवसेनेनं सत्ता मिळवली आहे. सावंतवाडीत आमदार आशिष शेलार यांच्या सासरवाडीसह 6 ग्रामपंचायतींवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर 5 ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात गेल्या आहेत.

राणे पिता-पुत्रांचं महाविकास आघाडीला थेट आव्हान

सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये कोकणात भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राणेंचा धक्का देणारा अजून जन्माला यायचा आहे, अशी प्रतिक्रिया दिली. कोकणात सर्वाधिक ग्रामपंचायती या भाजपच्यात येतील असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. तर कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. महाविकासआघाडीने भाजपला (BJP) दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असं थेट आव्हानच राणेंनी शिवसेनेला दिलंय.

उदय सामंत यांची भाजपवर टीका

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. हा विजय म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आहे. आपला माणूस ही प्रतिमान महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. हा निकाल म्हणजे त्याचीच पोचपावती असल्याचं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटवलंय. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा गड सेनेनं घेतलाय ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहनत असल्याचंही सामंत म्हणाले.

राणेंचं अस्तित्व कधीच संपलं- भास्कर जाधव

कोकणात नारायण राणे यांचं अस्तित्व कधीच संपलं आहे. कोकणात भाजप नावालाही शिल्लक नाही. कोकणात भाजपनं मुसंडी मारलेली नाही. त्याउलट राज्यात प्रत्येक ठिकाणी फक्त महाविकास आघाडीचाच बोलबाला असल्याचा दावा शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलाय. राणेंबद्दल बोलण्यात आपल्याला काही स्वारस्य नाही. कारण त्यांचं तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते, अशी टीकाही जाधव यांनी केलीय.

संबंधित बातम्या :

मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती: नारायण राणे

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021: आम्ही 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायती जिंकू, भाजपचा दावा

BJP dominance in Sindhudurg district, Rane, Samant and Jadhav’s counter-claims