Lok Sabha Elections 2024 : नंदुरबारमध्ये सर्वाधिक, तर शिरुरमध्ये सर्वात कमी मतदान, महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात दिवसभरात किती टक्के मतदान?
महाराष्ट्रात आज लोकसभेच्या 11 मतदारसंघासाठी मतदान पार पडलंय ज्यात मंत्री रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला आहे. विशेष म्हणजे पुणे, शिरुर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान झालं.

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात 11 लोकसभेच्या मतदारसंघासाठी मतदान झालं आणि चौथ्या टप्प्यात, 52 टक्क्यांवर मतदान झालं. पुण्यात तिरंगी लढत आहे. भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरेंमध्ये सामना आहे. पुण्यात 44.90 टक्के मतदान झालंय. पुण्यात कमी मतदान झाल्यानं धाकधूक वाढलीय. पुण्यानंतर शिरुरची लढाई लक्ष्यवेधी आहे. शिरुरमध्ये 43.89 टक्के मतदानाची नोंद झालीय. शिरुरमध्ये शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हेंच्या विरोधात, अजित पवार गटाकडून आढळराव पाटील मैदानात आहेत. मावळमध्ये 46.03 टक्के मतदानाची नोंद झालीय. इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आहे. शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंविरोधात ठाकरे गटाचे संजोग वाघेरे लढतायत.
जालन्यात 59.44 टक्के मतदानाची नोंद झालीय. इथं भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्यात विरोधात काँग्रेस कडून कल्याण काळे फाईट देत आहेत. मराठवाड्यातली आणखी एक जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर… इथं तिरंगी लढत आहे. संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे, ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे आणि MIMकडून इम्तियाज जलील मैदानात आहेत. संभाजीनगरमध्ये 54.02 टक्के मतदान झालंय. बीडमध्ये 58.37 टक्के मतदानाची नोंद झालीय. बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे पहिल्यांदाच खासदारकीसाठी उभ्या आहेत. त्यांना शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे टक्कर देत आहेत. नंदूरबारमध्ये भाजपच्या हिना गावित आणि काँग्रेसच्या गोवाल पाडवींमध्ये थेट लढत आहे. इथं 60.60 टक्के मतदानाची नोंद झालीय.
जळगावात भाजपला गड राखता येणार?
जळगावात 51.98 टक्के मतदानाची नोंद झालीय. इथं भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाच्या करण पवारांमध्येच मुख्य लढत आहे. रावेरमध्ये 56.16 टक्के मतदानाची नोंद झालीय. रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसे आणि शरद पवार गटाच्या श्रीराम पाटील आमनेसामने आहेत. अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजय विखेंच्या विरोधात शरद पवार गटाकडून निलेश लंके मैदानात आहे. नगरमध्ये 53.27 टक्के मतदानाची नोंद झालीय.
शिर्डीत शिवसेना विरुद्ध शिवसेना
इकडे शिर्डीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. शिर्डीत 55.27 टक्के मतदानाची नोंद झालीय. इथं शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरेंमध्ये सामना आहे. महाराष्ट्रात आता शेवटचा पाचवा टप्पा बाकी आहे. पाचव्या टप्प्यासाठी 20 तारखेला मतदान आहे. ज्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणेसह मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश आहे.
