
भाजप नेते नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांना माझ्यावर टीका करण्याचं काम लावण्यात आलं आहे. त्यांच्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आमदार आणि काही संघटनांना जमा करून मला उघडं पाडण्याचं अभियान सुरू आहे. मला एकटं पाडण्यासाठी सरकारचा हे षडयंत्र आहे. त्याला अभियान असं नाव दिले गेलं आहे, असा गंभीर आरोप करतानाच मला राजकारण आवडत नाही. तसं असतं तर मी या आधीच खासदार झालो असतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. राजकारणात काही डाव खेळावे लागतात. ते डाव या राजकारण्यांनीच मला आता शिकवले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मनोज जरांगे पाटील हे कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी हा आरोप केला. जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत त्यांना आम्ही निवडणुकीत पाडू. आमच्यासोबत गरीब ओबीसी सुद्धा आहेत. आताच काही तरी होऊ शकतं हे त्यांना देखील कळलं आहे. राजकीय पक्षांच्या यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी आहेत. त्यांना पक्ष मोठे करायचे आहेत. 29 तारखेला अंतरवली सराटीमध्ये या. मराठा काय असतो हे दाखवतो, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आमच्या भांडणांमुळे राजकारण्यांची पोळी भाजणार नाही. तर त्यांच्या भांडणामुळे आमची पोळी भाजली जाणार आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांना मी सोडत नसतो. राज्यातला विरोधी पक्ष किमान आरक्षणाच्या विरोधात तरी बोलत नाही. सत्ताधारी मात्र थेट उलट बोलत आहेत, असा हल्लाच मनोज जरांगे पाटील यांनी चढवला.
ओबीसी नेत्यांकडून कुणबींचा आकडा फुगवून सांगितला जात आहे. त्यामुळे गैरसमज पसरत आहेत. आता आमचा राजकीय फायदा आम्हालाच होणार आहे. आरक्षणाची ही लाट गोरगरीब मराठ्याच्यांच्या कामाला येणार आहे. सलग एक वर्ष चालणार देशातलं कदाचित हे एकमेव आंदोलन आहे. एक वर्षानंतरही हे आंदोलन तितक्याच तीव्रतेने सुरू आहे. माझ्या मागे कोण आहे हे शोधण्यासाठी गोदापट्ट्यात ड्रोन लावले. मात्र अजूनही त्यांना कोणी सापडले नाही. माझ्यामागे कोण आहे? मला पैसे कोण पुरवतो? याच्यावर त्यांची नजर होती, असा आरोपही त्यांनी केला.
सगेसोयरे आणि रक्त संबंध यात फरक आहे. रक्ताच्या नात्यात लग्न होत नाही. सगेसोयरे कुणाला म्हणावे? लाभार्थी कोण असू शकतात? याची व्याख्या आम्ही सरकारला दिली आहे. मात्र, सध्या ते अडचणीत आहेत. मराठा समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे, असं सांगतानाच कोल्हापुरातील एक नेता आहे. तो आता पुण्याचं प्रतिनिधत्व करतोय. तो काहीही बरळत आहे, असा टोला जरांगे यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना लगावला.