धर्मा पाटलांच्या मुलाचा मनसेला रामराम, अजित पवारांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटील राष्ट्रवादीत

मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकून सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

धर्मा पाटलांच्या मुलाचा मनसेला रामराम, अजित पवारांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटील राष्ट्रवादीत

मुंबई : मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश (MNS Narendra Patil enters NCP) केला आहे. एकीकडे मनसेचं महाअधिवेशन सुरु असतानाच मनसेसाठी हा धक्का मानला जात आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

नरेंद्र पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. त्यानंतर पाटील यांनी मनसेच्या तिकीटावर धुळ्यातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांच्या आतच नरेंद्र पाटील यांनी मनसेला रामराम ठोकून सत्ताधारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

अल्पसंख्याक सेलची बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन यासारखे नेते उपस्थित होते.

राज ठाकरेंनी सप्टेंबर महिन्यात विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली होती, तेव्हाच दोन उमेदवारही जाहीर केले होते, त्यामध्ये नरेंद्र पाटील यांचा समावेश होता. नरेंद्र पाटील यांना पक्षात घेत राज ठाकरेंनी लगोलग तिकीटही दिलं होतं.

कोण आहेत धर्मा पाटील आणि नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे आहेत. त्यांचे वडील धर्मा पाटील यांनी संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी 22 जानेवारी 2018 रोजी मंत्रालयात विष प्राशन केलं होतं, उपचारादरम्यान 28 जानेवारीला त्यांचं निधन झालं होतं.

धर्मा पाटील यांच्या निधनानंतर नरेंद्र पाटील आणि त्यांच्या मातोश्रीने तत्कालीन फडणवीस सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडलं होतं. माजी मंत्री गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली होती.

नरेंद्र पाटील यांनी 2018 मध्ये विखरण गावातील मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा इशाराही दिला होता. भूसंपादन प्रक्रियेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ नरेंद्र पाटलांनी हा पवित्रा घेतला होता. त्यानंतर मनसेत प्रवेश करुन नरेंद्र पाटील यांनी राजकारणात उडी घेतली होती.

MNS Narendra Patil enters NCP

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *