आणखी पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर : गिरीश महाजन

आणखी पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर : गिरीश महाजन

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंग मोहिते पाटील हे भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. रणजिंतसिंग मोहिते पाटील यांच्या मतदारसंघात त्यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. ते उद्या अधिकृतरित्या बिनशर्त भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात संपर्क कार्यालयात बोलताना दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाच ते सहा मोठे नेते आणि त्यांची मुलं देखील भाजपात येण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत. ते भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. आता लोकांचा भाजपावर विश्वास वाढला असून सुशिक्षित पिढीचा देखील वाढता कल दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या राजकारणाला तरूण पिढी पूर्णपणे कंटाळली आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

जळगाव मतदारसंघासाठी उमेदवार हा निवड समितीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात भाजपाची उमेदवारांची नावे जाहीर होतील, असं महाजन म्हणाले. पक्षात मुले पळविण्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावत सांगितले की, आमच्याकडे जवळपास 14 ते 15 दिग्गज नेत्यांची नावे आहेत. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला द्यावी असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

आता हा निर्णय निकालानंतर कळेलच. महापालिका, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पूर्णपणे सुपडासाफ आहे. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. एवढ्या मोठ्या संख्येने भाजपा मागच्या निवडणुकीत निवडून आली. जळगावात काँग्रेसला लोकसभा किंवा विधानसभात नुसता भोपळाही फोडता आला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार जळगाव जिल्ह्यात आहे. इतर पक्षांकडे काहीही शिल्लक नाही. एखादा खासदार तर सोडाच, किमान आता आमदार विरोधकांनी निवडून दाखवावा, असं आव्हान त्यांनी दिलं.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा आहे. पण जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे आम्ही दिल्ली पाठविलेले नाही. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आपल्या अहवालानुसार नावे निश्चित करण्यात येणार आहेत, असं ते म्हणाले.

Published On - 10:20 pm, Tue, 19 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI