…अन्यथा संघर्ष अटळ आहे : राज ठाकरे

...अन्यथा संघर्ष अटळ आहे : राज ठाकरे

मुंबई : फेरीवाल्यांवर कारवाई करा, अन्यथा पुन्हा संघर्ष पाहायला मिळेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे. यावेळी राज ठाकरेंनी इशारा कुठल्या सभेत दिला नाही, तर थेट महापालिका आयुक्तांना बोलून दाखवला आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि फेरीवाल्यांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात जाऊन महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेतली. महापौर बंगला, फेरीवाल्यांचा मुद्दा यांसह विविध विषयांवर राज ठाकरेंनी महापालिका आयुक्तांशी चर्चा केली.

फेरीवाल्यांबद्दल राज ठाकरे नेमकं काय बोलले?

महापालिका आयुक्तांना फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर भेटलो, असे सांगत राज ठाकरे पुढे म्हणाले, “महापालिकेचे अधिकारी पैसे घेऊन फेरीवाल्यांना बसायला जागा देत आहेत. न्यायालयाचे आदेश पाळले जात नाहीत. आताच कारवाई करा, अन्यथा पुन्हा संघर्ष पाहायला मिळेल.”. तसेच, फेरीवाला धोरण योग्य पद्धतीने राबवले जावे, असेही राज ठाकरेंनी महापालिका आयुक्तांना बोलून दाखवले.

दरम्यान, येत्या काही दिवसात राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार आहेत. आपलं अवघं राजकारण उत्तर भारतीयांच्या विरोधात करणारे राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार असल्याने, त्याची जोरदार चर्चा झाली होती. मात्र, आता राज ठाकरे पुन्हा फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर संघर्षाच्या गोष्टी करु लागले आहेत. त्यामुळे येत्या काळात पुन्हा मनसे विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष दिसला, तर आश्चर्य वाटायला नको.

महापौर बंगल्याबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

“दादरमधील क्रीडा भवन जागा महापौर बंगल्यासाठी दिली जात आहे, हे कळलं आहे. तर आयुक्तांना सांगितले की, ही जागा कोणत्याही परिस्थितीत महापौर बंगल्याला देणार नाही.”, असे राज ठाकरे म्हणाले.

“बाळासाहेबांनी शिवसेनेचा महापौर बंगल्यात बसवला, आता बंगल्याची जागा काबीज केली गेली. बाळासाहेबांसाठी इतर कुठेही जागा मिळाली असती. पण फक्त आपल्या फायद्यासाठी ही जागा काढून घेतली जात आहे. महापौरांना बंगल्यासाठी इतर फिरावं लागत हे दुर्दैव आहे.” असेही राज ठाकरे म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI