“अरे अजित, कल्याण कुठे आहे बघ, मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता”

अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल टिप्पणी केलीय. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्येही एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 17:25 PM, 8 Apr 2021
"अरे अजित, कल्याण कुठे आहे बघ, मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता"
भगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी अजित पवारांची सभा

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकी रणधुमाळी आता शिगेला पोहोचलीय. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी मोठ्या संख्येनं पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल टिप्पणी केलीय. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्येही एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. (Deputy CM Ajit Pawar’s campaign for NCP candidate Bhagirath Bhalke)

“कल्याणराव काळे बाबा मधल्या काळात तिकडे (भाजपमध्ये) गेला होता. तेल्हा कल्याणरावे काळे यांच्या वसंतराव काळेंनी मला विचारलं, अरे अजित कल्याण कुठे आहे बघ. तेव्हा कल्याण काळेपण मला म्हणाला असता, दादा तुम्हीपण नव्हता दोन दिवस तिकडे गेलेला!”, अशा शब्दात अजित पवार यांनी फडणवीसांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीवरुन टिप्पणी केली. तेव्हा व्यासपीठावर उपस्थित नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांमध्येही हशा पिकला.

‘कोरोना नियम पाळून मतदान करा’

आमच्या हातात होत्या त्या निवडणुका आम्ही पुढे ढकलल्या. सहकार विभागाच्या निवडणुका आमच्या हातात होत्या त्या आम्ही लांबणीवर टाकल्या. पण आता मतदानाला जाताना गर्दी करायची नाही. मास्क वापरायचे, अशी सूचना अजित पवार यांनी नागरिकांना केलीय. तसंच आता कुणाला मतदान केल्यावर आपले प्रश्न सुटणार आहेत याचा विचार करुन मतदान करा, असं आवाहनही अजितदादांनी केलंय.

भारत भालकेंच्या आठवणींना उजाळा

समाधान आवताडेला रस्ता करता येत नाही. जनतेचा पैसा कर रुपाने जातो आणि तुम्ही असे रस्ते करता? भारत भालके सर्वसामान्य लोकांसाठी सतत प्रयत्न करत होते. पण वरच्याचं बोलावणं आलं की कुणाला थांबता येत नाही, असं म्हणत अजित पवार यांनी भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे कदाचित ते प्रचाराला येऊ शकणार नाहीत, असंही अजित पवारांनी सांगितलं.

‘आम्ही भगीरथ भालकेच्या पाठीशी’

प्रसंग बाका आलाय. एकीकडे कोरोनाचं संकट आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांवर संकट आहे. साखर कारखाने अडचणीत आहेत. पवार साहेबांनी 50 वर्षाच्या काळात बंद पडलेले अनेक साखर कारखाने पुन्हा उभे केले. वडिलांच्या निधनानंतर भगीरथ भालकेवर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जबाबदारी आली आहे. आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू, असं सांगत अजित पवार यांनी भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीत विजयी करण्याचं आवाहन मतदारांना केलंय.

संबंधित बातम्या :

भाजप नेते कल्याणरावांच्या घरी जाऊन बसले, अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना : अजित पवार

VIDEO | “दादा मास्क काढा” भाषणादरम्यान चिठ्ठी, अजित पवार म्हणतात, “हा शहाणा मला सांगतोय”

Deputy CM Ajit Pawar’s campaign for NCP candidate Bhagirath Bhalke