कोयत्याला न्याय मिळेल, त्याची धार आणि सन्मानाची जबाबदारी कामगार-मुकादमावर : पंकजा मुंडे

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत (Pankaja Munde on Sugar cane worker ).

कोयत्याला न्याय मिळेल, त्याची धार आणि सन्मानाची जबाबदारी कामगार-मुकादमावर : पंकजा मुंडे

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत (Pankaja Munde on Sugar cane worker ). राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. कोयत्याला न्याय मिळेल. ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय. त्यांनी याबाबत ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

पंकजा मुंडे म्हणाले, “माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जेष्ठ नेते खासदार शरद पवार, कारखानदारांचे प्रतिनिधी नामदार जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, आपल्या कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल. तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे.”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर क्षेत्रावर जसा परिणाम झालाय तसाच सहकार आणि ऊस कारखानदारीवरही मोठा परिणाम झालाय. त्यामुळे ऊसतोड कामगार आणि मुकादमांवरही मोठा आर्थिक ताण आला आहे. या प्रश्वावरच पंकजा मुंडे उच्चस्तरावर काही निर्णय घेण्याची मागणी करणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मागील कराराच्या अंतरीम वाढीसह ऊसतोड कामगारांच्या मजूरीत 150 टक्के वाढ केल्याशिवाय यंदा कारखान्याचे चाक फिरु देणार नाही, असा इशारा आमदार सुरेश धस यांनी दिला होता. मात्र, लवादाच्या प्रमुख पंकजा मुंडे म्हणतील तो अंतिम शब्द राहिल, असंही धस म्हणाले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज ट्विट करत कोयत्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती दिलीय.

ऊसतोड कामगारांच्या मागण्या काय?

ऊसतोडणी कामगारांची मागील 5 वर्षातील अंतरीम वाढीसह मजूरीत 150 टक्के वाढ द्यावी. तसेच मुकादमांचे 37 टक्क्यांपर्यंत कमिशन वाढवावे. बैलगाडीचा दर 208 रुपये (यात हेळक, मुंगळा, जुगाड, घंटा) आणि डोकीसेंटर 239 रुपये (ट्रक, ट्रॕक्टर टोळी) तर गाडीसेंटर 267 रुपये अशा पद्धतीने आजचे दर आहेत. या दराप्रमाने नवरा बायको ऊसतोड कामगार जोडीला 416 रुपये मिळतात.

सुरेश धस म्हणाले, “मिस्त्री,बिगारी कामगार इतर कामावर असलेले मजूर सकाळी 11 ते 5 या वेळेतच काम करतात, तर ऊसतोड कामगार रात्रंदिवस काम करुनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. ते कारखान्यावर जनावरे सांभाळतात त्यांचा खुराक पेंडचा खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार करता ऊसतोड कामगारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे ऊसतोड कामागारांच्या गळतीचे प्रमाण मागील 5 वर्षात 60 टक्क्यावर गेले आहे. लोक ऊसतोडणीचा धंदा सोडून शहरात वॉचमन होणे पसंत करत आहेत. ऊसतोडणीत पैसा मिळत नसल्याने ते दुसरीकडे जात आहेत. या कारणांमुळे मुकादमांच्या संसाराचे वाटोळे झाल्याचा आरोप कामगार करत आहेत.”

“सध्याच्या 18.5 टक्के कमिशनवर गुजराण होत नाही. त्यामुळे 3 ते 4 रुपये शेकडा व्याजाचे पैसे घेण्याची वेळ कामगारांवर आली आहे. अनेक मुकादम यामुळे व्यसनाधीन झाले आहेत. अनेकांनी आपली जीवनयात्राही संपवली आहे. त्यामुळे ही भाववाढ झाली पाहिजे. तसेच करार 3 वर्षांचाच असला पाहिजे 5 वर्षांचा चालणार नाही. टिडीएस हा ऊसतोड कामगारांकडून कपात केला जाता कामा नये. अनेक कारखान्यांनी असे उद्योग केलेले आहेत. तसेच 100 टक्के शौचालयाची सोय केल्याशिवाय कुठल्याही कारखान्याला साखर आयुक्तांनी गाळप परवानगी देऊ नये. शौचालयाची सोय नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. अनेक महिलांना यामुळे किडनी स्टोनचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे,” असंही सुरेश धस यांनी नमूद केलं.

कामगारांचा विमा हा कारखान्यांनीच भरला पाहिजे. तसेच येणे जाणे भाडे 100 टक्के कारखान्यांनीच दिले पाहिजे. प्रत्यक्षात गाडीभाडे 20 हजार असेल तर कारखाना 12 हजार रुपये आणि मुकादम 8 हजार पदर भरतो. अशा विविध मागण्या ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.

हेही वाचा :

मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन? : पंकजा मुंडे

खडसे, तावडे, पंकजा मुंडेंना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी?

शिक्षकांच्या बदल्यावरुन पंकजा मुंडे आक्रमक, ठाकरे सरकारकडे रोखठोक मागणी

Pankaja Munde on Sugar cane worker

Published On - 10:35 am, Mon, 7 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI