उद्धव ठाकरेंचा आशिर्वाद घेण्यासाठी ‘मातोश्री’वर : पंकजा मुंडे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:15 PM, 16 Mar 2019
उद्धव ठाकरेंचा आशिर्वाद घेण्यासाठी 'मातोश्री'वर : पंकजा मुंडे

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विविध पक्षांचा जागांचा तिढा कायम असल्याचं दिसतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली लोकसभा उमेदवारांची यादीही जाहीर केली. मात्र भाजप-शिवसेना युतीची उमेदवार यादी अद्याप जाहीर झालेली नाही. याचदरम्यान भाजप नेत्या आणि राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.

पंकजा मुंडेच्या ‘मातोश्री’ भेटेमुळे चर्चेला उधाण आलं आहे. कारण एकाचवेळी मातोश्रीवर शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरही उपस्थित होते. गेले काही दिवस जालना लोकसभेच्या जागेसाठी अर्जुन खोतकर आग्रही आहेत. मात्र जालना मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या खासदार आहेत. ही जागा भाजपची आहे पण तरीही अर्जुन खोतकर यांनी या जागेवर लढण्यासाठी आग्रह धरला आहे.

एकीकडे जालन्याच्या तिढा सोडवण्यासाठी खोतकर ‘मातोश्री’वर गेले असताना, त्याचवेळी पंकजा मुंडेही उपस्थित असल्याने, अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले.

 मात्र “उद्धव ठाकरेंसोबतची भेट राजकीय नाही. आमचे चांगले संबंध आहेत. त्यांचा आशिर्वाद घ्यायला आले होते. तसेच सभांसंदर्भात निमंत्रण देण्यासाठी मी आले होते. लोकसभेच्या जागा आज घोषीत झाल्यावर कळेलच, पण जालना संदर्भात ही बैठक नव्हती”, असं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

जालना लोकसभा मतदार संघावरुन युतीमध्ये खलबतं सुरु आहेत. आजच अर्जुन खोतकर यांनी आपण जागा कशी जिंकू याबद्दलची माहिती उद्धव ठाकरेंना दिली. तसेच जागा मिळत नाही तोपर्यंत समाधानी नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.