लोकसभा निवडणूक : मुंबईतील मतदानावर 40 हजार पोलिसांचा पहारा

लोकसभा निवडणूक : मुंबईतील मतदानावर 40 हजार पोलिसांचा पहारा

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. निवडणुकांच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी 29 एप्रिलला पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील 17 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी मुंबईमध्ये सहा लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच मतदान सुरळीतरित्या पार पडावं यासाठी संपूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासोबत अतिरिक्त सुरक्षा दलालाही तैनात करण्यात आलं आहे. मुंबईत सोमवारी मतदानासाठी 40 हजार 400 पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रस्त्यावर ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरु आहे. मुंबईत 204 व्यक्तींना तडीपार करण्यात आलं आहे. तर 6,029 व्यक्तींकडून बॉण्ड लिहून घेण्यात आले आहेत. त्याशिवाय 5 हजार 765 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर 391 अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली असून त्याप्रकरणी 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, सर्व पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निवडणुकिच्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. मुंबई शहरात लोकसभेच्या 2 जागांसाठी, तर उपनगरात चार जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेत पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोस्टांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस ठाणे आणि तपास यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मुंबई शहरात कोणतंही असुरक्षित बूथ नसून तब्बल 325 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्त्यावर 40 हजार 400 पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त असणार आहे. त्याशिवाय सीपीएमएफच्या 14 कंपन्या, एसआरपीएफच्या 12 कंपन्या, 6000 होमगार्डसह फोर्स वन, क्युआरटी पथक, असॉल्ट पथक आणि एटीएसची टीम बंदोबस्तावर असेल. तसेच, नागरी सुरक्षा दलाचे अधिकारीही सुरक्षा यंत्रणांसोबत रस्त्यावर उतरले आहेत.

मुंबईत मतदान शांततेने पार पडावं यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी निर्भय होऊन मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI