संजय राऊतांच्या चौकशीच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही : प्रवीण दरेकर

“संजय राऊत यांनी यादी देण्यासाठी मुहूर्त बघू नये. उशीर करु नका नाहीतर आपण बोलघेवडे आहात, असा त्याचा समज होईल”, अशी खोचक टीका प्रवीण दरेकर यांनी केली (Pravin Darekar slams Sanjay Raut).

  • चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा
  • Published On - 16:14 PM, 25 Nov 2020

वर्धा : “शिवसेना नेते संजय राऊत यांच्या चौकशीच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही. अशाप्रकारे टार्गेट करण्याला भाजप जराही घाबरत नाही. कारण भाजपच्या नेत्यांचा कारभार स्पष्ट आणि स्वच्छ आहे, हे जनतेला देखील माहीत आहे. त्यामुळे जनाधार भाजपला राहिला आहे”, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. ते वर्ध्यात पत्रकार परिषदेत बोलत होते (Pravin Darekar slams Sanjay Raut).

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीकडून काल (24 नोव्हेंबर) छापेमारी करण्यात आली. या छापेमारीवरुन संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी “संजय राऊत यांच्याकडे भाजपच्या 100 नेत्यांची यादी असेल तर त्यांनी ईडीला जरूर द्यावी. त्याची चौकशी करण्याची हमी मी देतो”,असं वक्तव्य केलं. या वक्तव्याला राऊत यांनी उत्तर दिलं.

“आधी तुम्हाला काय चौकश्या करायच्या त्या करून घ्या. मग तुमच्या 100 नव्हे 120 नेत्यांची यादी देतो. त्यांच्याही चौकश्या होऊनच जाऊ द्या”, असं आव्हानच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिलं आहे. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांनी या मुद्द्यावरुन राऊत यांच्यावर निशाणा साधला.

“संजय राऊत यांनी यादी देऊ, असं बोलून चार दिवस झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांना तात्काळ यादी देण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यादी देण्यासाठी मुहूर्त बघू नये. तत्काळ यादी देऊन टाका. उशीर करु नका नाहीतर आपण बोलघेवडे आहात, असा त्याचा समज होईल. सत्य जनतेपुढे येऊ द्या”, अशी खोचक टीका दरेकर यांनी केली.

“भाजप अशा प्रकारची कुठलीही कारवाई करत नाही. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे ती उगाच कारवाई करत नाही. लहर आली म्हणून कारवाई केली, असं होत नाही. त्याबाबत तक्रार असेल”, असं प्रवीण दरेकर म्हणाले (Pravin Darekar slams Sanjay Raut).

“महाविकास आघाडी सरकार नक्कीच कोसळेल. या सरकारमध्ये संवाद नाही. एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरु आहे. या गोष्टीचा कधीतरी अंत होईल. आतमधून हे खूप पोखरले आहेत. विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागेल, त्यावेळी जनतेचा कौल माहीत पडेल. अंतर्गत विसंवादातून हे सरकार कोसळेल. सरकार कोसळेल त्यावेळी भाजप सक्षम पर्याय म्हणून चांगलं सरकार देऊ शकेल”, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.

संबंधित बातम्या :

भाजपच्या 120 नेत्यांची यादी देतो, तुमच्याही चौकशा होऊन जाऊ द्या, संजय राऊतांनी ललकारले

मुंबै बँक घोटाळ्याची चौकशी सुरु, सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांची माहिती; आम्ही चौकशीला घाबरत नाही, प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान