नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाला, सत्तारांच्या राजीनाम्यावरुन गिरीश बापटांचे चिमटे

नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाला, सत्तारांच्या राजीनाम्यावरुन गिरीश बापटांचे चिमटे

आम्ही आजही शिवसेनेला सोबत घ्यायला तयार आहोत, पण ही इच्छा त्यांनीही व्यक्त केली पाहिजे, असं गिरीश बापट म्हणाले.

अनिश बेंद्रे

|

Jan 04, 2020 | 12:33 PM

पुणे : नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाला, अशा शब्दात भाजप खासदार गिरीश बापट यांनी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या वृत्तावरुन चिमटे काढले (Girish Bapat on Abdul Sattar) सत्तार यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात असलं, तरी शिवसेनेकडून त्याचा इन्कार करण्यात आला आहे.

‘मी अजून बातमी ऐकली किंवा वाचली नाही. ऐकीव बातम्यांवर मी प्रतिक्रिया देत नाही. तीन पायांच्या शर्यतीत अजून खूप मोठ्या घडामोडी घडणार आहेत. सरकार स्थापन होऊन काम सुरु व्हायच्या आधीच मंत्रिमंडळात किती अस्थितरता, चलबिचल आहे याची प्रचिती सत्तारांना आली’ असं गिरीश बापट म्हणाले.

‘कोणाला काय काम दिलं, कोणतं खातं दिलं, हा आमचा विषय नाही. भविष्यकाळात काय वाढून ठेवलंय, कसं चालणार, याची छोटीशी चुणूक राजीनाम्यामुळे दिसल्याचं बापट म्हणाले. ते पुण्यात ‘टीव्ही9 मराठी’शी बोलत होते.

महाविकास आघाडीतील अनेक जण नाराज आहेत, बाहेर पडतील की नाही, हे सांगता येणार नाही. तीनही पक्ष तत्वाशी तडजोड करतील, हे सांगता येणार नाही, असंही गिरीश बापट म्हणाले.

अब्दुल सत्तारांनी खरंच राजीनामा दिला असेल, तर ही फक्त सुरुवात आहे. हे म्हणजे नवरदेव बोहल्यावर चढण्याआधीच पळाल्यासारखं आहे. हे तीन तिघाडी सरकार असंच चालणार असेल, तर हे राज्याचं दुर्दैव आहे. आम्ही आजही शिवसेनेला सोबत घ्यायला तयार आहोत, पण ही इच्छा त्यांनीही व्यक्त केली पाहिजे, असं गिरीश बापट म्हणाले.

अब्दुल सत्तार यांचा राजीनामा 

मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप होण्याआधीच शिवसेनेला पहिला धक्का बसला. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असताना पदरी पडलेलं राज्यमंत्रिपद आणि औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन अब्दुल सत्तार गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर कमालीचे नाराज होते. या नाराजीतूनच सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

अब्दुल सत्तार यांचा राजीनामा शिवसेनेकडे आलेला नाही. सत्तार ज्या नेत्यांकडे राजीनामा दिला असं सांगत आहेत त्यांच्याकडे राजीनामा आलेला नाही, असं शिवसेना नेते अनिल देसाई यांनी सांगितलं आहे.

शिवसेना प्रवेशाने आश्चर्य

सुरुवातीला अब्दुल सत्तार यांचा भाजपात प्रवेश करण्यासाठी जास्त आग्रह होता, यासाठी त्यांनी दोन वेळा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक वेळा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. पण सिल्लोड मतदारसंघातील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला कडवा विरोध केला. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला.

महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांना थेट हाताला धरुन यात्रेच्या रथावर खेचून घेतलं, त्यावेळी अब्दुल सत्तार यांचा भाजपप्रवेश नक्की मानला जात होता. मात्र या घटनेनंतर चारच दिवसात अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.

Girish Bapat on Abdul Sattar

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें