मनसेचं ‘एकला चलो रे’! भाजपसोबत युतीसंदर्भातील चर्चेला राज ठाकरेंकडून पूर्णविराम

राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा दिला आहे. भाजपसोबत जाण्याबाबत आता लगेच निर्णय नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे.

मनसेचं 'एकला चलो रे'! भाजपसोबत युतीसंदर्भातील चर्चेला राज ठाकरेंकडून पूर्णविराम
Raj Thackeray

पुणे : शिवसेनेला आणि पर्यायानं महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजप आणि मनसेची युती होऊ शकते, या चर्चेला खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा दिला आहे. भाजपसोबत जाण्याबाबत आता लगेच निर्णय नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे एकत्र येणार, या चर्चेला आता ब्रेक लागला आहे.(Raj Thackeray ends BJP-MNS alliance talks)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसेच्या 14 जणांच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेतली. ही बैठक जवळपास 2 तास चालली. यावेळी राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकीसंदर्भात अहवाल देण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा देत कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

मनसेने परप्रातियांबद्दल भूमिका बदलावी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मनसे परप्रांतियांबद्दलची भूमिका सोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा नाही,असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मनसे आणि भाजप युतीबदल तुमच्याकडून चर्चा ऐकतोय, असंही पाटील म्हणाले. भारत हा एक देश आहे, त्यामुळेपरप्रांतियांशी संघर्ष योग्य नाही. राज ठाकरे जोपर्यंत भूमिका बदलणार नाहीत, तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

त्याचबरोबर युती करण्याबाबत मनसेकडून अजून प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही देखील त्याबाबत विचार केलेला नाही. मनसेची युती करायची झाली तर त्यांची अमराठी भाषिकांबद्दलची भूमिका त्यांना बदलावी लागेल, असंही पाटील म्हणाले होते.

कल्याण-डोंबिवलीसाठी मनसेचा मेगाप्लॅन

कल्याण डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ‘कृष्णकुंज’वर खलबतं सुरु झाली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी मनसेने तयार केली आहे.

मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी दिली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अभिजित पानसे, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, सरचिटणीस संजय नाईक, राजा चौगुले या बैठकीला उपस्थित होते.

लोकसभा मतदारसंघनिहाय मनसेची समिती

1) उत्तर मुंबई

बाळा नांदगावकर – नेते, मनसे संजय नाईक – सरचिटणीस, मनसे

2) उत्तर मध्य

संजय चित्रे – नेते, मनसे राजा चौगुले – सरचिटणीस, मनसे

3) उत्तर पश्चिम

शिरीष सावंत – नेते, मनसे आदित्य शिरोडकर – सरचिटणीस, मनसे

4) दक्षिण मध्य

अविनाश अभ्यंकर – नेते, मनसे नयन कदम – सरचिटणीस, मनसे

5) दक्षिण मुंबई

नितीन सरदेसाई – नेते, मनसे मनोज चव्हाण – सरचिटणीस, मनसे

6) उत्तर पूर्व

अमित ठाकरे – नेते, मनसे संदीप देशपांडे – सरचिटणीस, मनसे

संबंधित बातम्या :

शिवसेना-भाजपचा मनसेला ‘दे धक्का’; राज ठाकरेंसाठी ‘हा’ मराठी अभिनेता पुढे सरसावला

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

Raj Thackeray ends BJP-MNS alliance talks

Published On - 9:53 pm, Fri, 5 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI