अयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे

आज बाळासाहेब असायला हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हवे होते, त्यांना खूप आनंद झाला असता, असं राज ठाकरे म्हणाले.

अयोध्येचा निकाल ऐकण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते : राज ठाकरे

पुणे : अयोध्या मंदिरबाबत  सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray on Ayodhya verdict ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे सध्या पुण्यात आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं. राज ठाकरे (Raj Thackeray on Ayodhya verdict ) म्हणाले, “आज अतिशय आनंद झाला. इतक्या वर्षाची प्रतीक्षा होती ती आज संपली असं म्हणायला हरकत नाही. या संपूर्ण आंदोलनात, संघर्षात ज्या कारसेवकांनी बलिदान दिलं, ते कुठेतरी सार्थकी लागलं असं म्हणावं लागेल. राम मंदिर लवकरात लवकर बांधावं. त्याशिवाय देशात रामराज्यही आणावं, जेणेकरुन आज ज्या देशात नोकऱ्या जातायेत, इतर काही गोष्टी घडतायत, ते संपावं. आजच्या निर्णयानंतर मला मनापासून काही वाटत असेल तर, आज बाळासाहेब असायला हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हवे होते, त्यांना खूप आनंद झाला असता. सर्वोच्च न्यायालयाचं मी मनापासून आभार मानेन, अभिनंदन करेन, इतका धाडसी निर्णय घेतला.”

राज ठाकरे यांनी मराठीत प्रतिक्रिया दिल्यानंतर, हिंदी मीडियाने राज ठाकरेंना हिंदीत प्रतिक्रिया देण्याची विनंती केली. त्यावर राज ठाकरेंनी टोमणे मारत, माझं हिंदी इतकं चांगलं नाही, असं म्हटलं. शिवाय मी विचार करतो, आणि बोलतो असं सांगितलं. राज ठाकरेंनी सार्थकी लागणे याला हिंदीत काय म्हणतात, हे सुद्धा उपस्थित पत्रकारांना विचारलं आणि सर्वजण विचार करा, असा सल्ला दिला.

अयोध्या निकाल

सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील (Ram Mandir in Ayodhya supreme court verdict) मंदिर-मशीद वादावर ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच (Ram Mandir in Ayodhya supreme court verdict) होईल, असा निर्णय दिला. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

कोर्टाने पुरातत्व विभागाच्या नोंदी, दस्तावेज आणि शेकडो वर्षांचे पुरावे तपासून हा निकाल दिला. आज सकाळी 10.30 वा. कोर्टाने निकाल वाचनाला सुरुवात केली. सुरुवातीलाच सरन्यायाधीशांनी तिसरा पक्ष शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरील दावा फेटाळून लावला. त्यामुळे रामलल्ला विरुद्ध सुन्नी वक्फ बोर्ड हे दोनच पक्षकार उरले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *