Rajya Sabha Election : राज्यसभेत क्रॉस व्होटींगची शक्यता किती? संजय राऊतांनी मविआची रणनिती जाहीर केली

10 जूनला जेव्हा मतमोजणी झालेली असेल, तेव्हा शिवसेनेचे दोन्ही, म्हणजेच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय. इतकंच नाही तर क्रॉस व्होटिंगच्या चर्चेवरुनही राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

Rajya Sabha Election : राज्यसभेत क्रॉस व्होटींगची शक्यता किती? संजय राऊतांनी मविआची रणनिती जाहीर केली
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Image Credit source: TV9
दिनेश दुखंडे

| Edited By: सागर जोशी

Jun 07, 2022 | 4:44 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) तोंडावर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात असल्यामुळे घोडेबाजाराचा आरोप आणि शकत्या वर्तवण्यात येत आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्ष आपले आमदार सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहेत. शिवसेनेनंही आपले आमदार सोमवारी पवईतील हॉटेल रिट्रिटला तर आज हॉटेल ट्रायडंटला नेले आहेत. अशावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा दावा केलाय. निवडणूक आहे, सगळेच पत्ते उघड करायचे नसतात. पण 10 जूनला जेव्हा मतमोजणी झालेली असेल, तेव्हा शिवसेनेचे दोन्ही, म्हणजेच महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय. इतकंच नाही तर क्रॉस व्होटिंगच्या चर्चेवरुनही राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

संजय राऊत म्हणाले की, क्रॉस व्होटिंगची शक्यता मला अजिबात वाटत नाही. एकतर जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्यांचा तर प्रश्नच येत नाही. कारण जी निवडणूक प्रक्रिया आहे त्यानुसार राजकीय पक्षाचे आमदार मत देण्यापूर्वी जो त्यांचा प्रमुख असतो त्याला मत दाखवायचं असतं. तिथे क्रॉस व्होटिंगची शक्यता अजिबात नाही. बाकी तिनही पक्षाचे जे आमदार आहेत ते आपल्या पक्षासोबत आणि नेत्यांसोबत अतिशय घट्ट आहेत. त्यामुळे जर कुणी अफवा पसरवत असेल की क्रॉस व्होटिंग होईल तर त्यांनी आपली मतं सांभाळावी, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिलाय.

आम्ही घाबरलेलो नाही, आमदारांच्या मार्गदर्शनासाठी बैठक

दरम्यान, आज संध्याकाळी महाविकास आघाडीचे नेते आणि सर्व आमदारांची बैठक होणार आहे. त्याबाबत विचारलं असता आम्ही घाबरलेलो नाही. आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक होणार आहे. या निवडणुका फार तांत्रिक असतात. त्यामुळे मतदानाची माहिती आमदारांना दिली जाईल असं राऊत यांनी सांगितलं.

छोटे पक्ष, अपक्षांच्या नाराजीवर राऊत म्हणतात…

काही अपक्ष आणि छोटे पक्ष जे सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडीसोबत आले ते आता नाराजी व्यक्त करत आहेत. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की लहान पक्षांच्या काही मागण्या असतात. अनेकदा त्या मागण्या मान्य होत नाहीत. ही कामं मार्गी लावण्याची त्यांच्यासाठी एक संधी असते. ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. हे सर्व पक्ष आजही आमच्यासोबत आहेत, असा दावाही राऊत यांनी केलाय.

ही निवडणूक म्हणजे पूर्ण बहुमत दाखवण्याची संधी

सरकार स्थापनेनंतर ही एकमेकांची शक्ती दाखवण्याची पहिली संधी आहे. ही निवडणूक म्हणजे पूर्ण बहुमत दाखवण्याची संधी आहे. हे आम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतलं आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या लोकांशी आमचा संवाद सुरु आहे. आमच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही. आम्ही रिलॅक्स आहोत, असं सांगत राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें