Arvind Sawant : तुमचं राजकीय पुनर्वसन केलं, तुमचं योगदान काय?; अरविंद सावंतांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर
सध्या जे सुरु आहे ते सबंध महाराष्ट्र हे उघड्या डोळ्याने पाहत आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी साधी चर्चा देखील केली नाही आणि पक्षाबद्दल कसली आलीय अस्वस्थता. हे सर्व उद्धव ठाकरे यांना झुकवायला निघालेले आहेत. पण औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती कधी झुकले नाहीत असेही अरविंद सावंत यांनी ठणकावले आहे. रामदास कदमांनी केलेल्या सर्व विधानांचा सावंतांनी समाचार घेतला आहे.

मुंबई : उठ..सूठ जो तो आता पक्षप्रमुखांना सल्ला देतोय. (Rebel MLA) बंडखोरांना सल्ला देण्याचा अधिकार कोणी दिला? अडचणीच्या काळात सर्वजण आपले स्वार्थ साधत आहेत. राजकीय पुनर्वसन व्हावे म्हणून यांना विधानपरिषदेवर पाठविले. मात्र, त्यांनीच आता पक्षप्रमुख यांचा छळ सुरु केल्याचे (Arvind Sawant) अरविंद सावंत म्हणाले आहेत (Ramdas Kadam) रामदास कदमांनी आपली भूमिका मांडल्यानंतर त्यांना सडेतोड उत्तर सावंतांनी दिले आहे. सध्या जे सुरु आहे ते सबंध महाराष्ट्र हे उघड्या डोळ्याने पाहत आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांनी साधी चर्चा देखील केली नाही आणि पक्षाबद्दल कसली आलीय अस्वस्थता. हे सर्व उद्धव ठाकरे यांना झुकवायला निघालेले आहेत. पण औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती कधी झुकले नाहीत असेही अरविंद सावंत यांनी ठणकावले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेच संकेत त्यांनी दिले तर रामदास कदमांनी केलेल्या सर्व विधानांचा सावंतांनी समाचार घेतला आहे.
कठीण काळात साथ सोडली, हे कसले शिवसैनिक?
सध्या पक्षावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कठीण प्रसंग आहे. पण अशा परिस्थितीमध्येही सच्चा शिवसैनिकांची त्यांना साथ कायम आहे. दगाफटका झाला तो जवळच्यांकडूनच. पक्ष सोडून गेलेले आपणच शिवसैनिक असल्याचा दावा करीत आहेत. पण त्याला कोणताही आधार नाही. खरे शिवसैनिक अजूनही स्थानिक पातळीवर आहेत. पण ज्यांना मंत्री केले. ज्यांचे पुनर्वसन विधानपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले ते आता सल्ला देत आहेत. त्यांनी तर कठीण काळात सोडल्याचा घणाघात सावंत यांनी कदमांवर केला आहे.
फुटीर गटाला भजपाशिवाय पर्याय नाही
शिवसेनेतील फुटीर गटाकडून पक्षावरच दावा केला जात आहे. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. न्याय प्रक्रियेवर आपला विश्वास असून यासंबंधी काय होईल याची सुनावणी ही उद्यापासूनच होत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात असे झाले नाही त्यामुळे फुटीर गटाला आता भाजपाशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आता भाजपात जाणार का ? असा सवाल सावंत यांनी रामदास कदम आणि शिंदे गटाला केला आहे. आता सल्ले देणाऱ्यांना उपकारांचा विसर पडला असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
शिवसेना प्रमुखांच्या नावाचा वापर
बंडखोर आमदार केवळ शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करुन घेत आहेत. पक्ष सोडला म्हणल्यावर बाळासाहेब ठाकरे हे नाव न वापरता आपले अस्तित्व दाखवून द्यावे असेही आव्हान अरविंद सावंत यांनी केले आहे. सोडलेल्या पक्षाचे कशाला नाव घेता. आणि खरे शिवसेना कोणती हे आता काही दिवसांमध्ये समोर येईलच. अरुणाचल प्रदेशातील निकालाची आठवण करुन देत न्यायालयातून का होईना न्याय मिळेल अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली आहे.
