फडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत

ती काही भूमिगत बैठक नव्हती, आम्ही बंकर किंवा तळगरामध्ये भेटलो नव्हतो. त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती, असे संजय राऊतांनी सांगितले.

फडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत


मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही वैयक्तिक शत्रू नाही, फडणवीसांसोबत गुप्त बैठक नव्हती, तर ‘सामना’साठी मुलाखत घेण्याबाबत चर्चा झाली, असे राऊत यांनी सांगितले. (Sanjay Raut clarification on meeting Devendra Fadnavis)

“शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ती काही भूमिगत बैठक नव्हती, आम्ही बंकर किंवा तळगरामध्ये भेटलो नव्हतो. त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती” असे संजय राऊतांनी सांगितले.

संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली

“मला ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी. त्यासंदर्भात चर्चा केली, एकत्र जेवलो, अगदी गोपनीय पद्धतीने जेवलो” असा टोला राऊतांनी लगावला.

“राजकारणात वैयक्तिक शत्रुत्व नसतं. आम्ही काही वैयक्तिक शत्रू नाही. भाजपसोबत असतानाही मी शरद पवारांशी बोलायचो. उद्धव ठाकरे आजही नरेंद्र मोदींना आपले नेते म्हणतात, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत.” असे राऊत म्हणाले.

“सध्या जी व्यवस्था आहे, ती पाच वर्षांसाठी आहे. राज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे योग्य प्रकारे सांभाळत आहेत. शरद पवार त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन आहे.” असं म्हणत सरकार पडण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळून लावली.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 26 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ते एकत्र होते. भेट झाल्यानंतर सुरुवातीला संजय राऊत यांनी भेटीचा इन्कार केला. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून स्पष्टपणे बाहेर पडताना दिसली, त्यामुळे या भेटीचं बिंग फुटलं. (Sanjay Raut clarification on meeting Devendra Fadnavis)

“अकाली दल बाहेर पडणे वाईट”

“अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली, याचे वाईट वाटले. अकाली दल आणि शिवसेना एनडीएचे मजबूत स्तंभ होते. आज दोन्ही स्तंभ एनडीएसोबत नाहीत. शिवसेनेला मजबुरीने बाहेर पडावे लागले. एनडीए म्हणजे अकाली दल, भाजप आणि शिवसेना. आम्ही दोघंही त्यात नसू, तर त्याला एनडीए म्हणणे मला पटत नाही. भाजपला आता नवे साथीदार मिळालेत त्यांना मी शुभेच्छा देतो” असेही संजय राऊत म्हणाले.

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या 

फडणवीसांना भेटणं अपराध आहे का?, राऊतांचा सवाल

अशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

संजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर

सेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात : सुधीर मुनगंटीवार

(Sanjay Raut clarification on meeting Devendra Fadnavis)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI