आमदार बेनके असं काय बोलले? शरद पवार आणि अजितदादांनी काय दिली प्रतिक्रिया?; नेमकं काय घडतंय?
अजितदादा गटाचे नेते अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याबाबतचं विधान केलं. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. हे दोन्ही नेते खरोखरच एकत्र येतील का? अशी चर्चा आता रंगली आहे. बेनके यांच्या या विधानाचं आमदार सुनील शेळके यांनीही समर्थन केलं आहे.

अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती. पण त्यानंतर अतुल बेनके यांनी जे विधान केलं, त्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. बेनके यांनी थेट अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात असं विधान केलं. त्यावरून राजकारण तापलं आहे. बेनके यांच्या या विधानाची अजित पवार आणि शरद पवार यांनाही दखल घ्यावी लागली आहे. प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. त्यामुळे राज्यात नेमकं काय घडतंय असा सवाल करण्यात येत आहे.
अजितदादा गटाचे नेते आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना मोठं विधान करून राज्यातील राजकीय चर्चांना फाटा दिला आहे. विधानसभा निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा कालावधी आहे. भेटीत मला साहेब काही बोलले नाही. मीही काही बोललो नाही. त्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच नाही. राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडली आहेत. अजूनही घडू शकतात हे नाकारू शकत नाही. यदाकदाचित अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र येतील हे सांगता येत नाही. पण मी निवडणूक कुठून लढायची हे आता सांगता येणार नाही, असं अतुल बेनके म्हणाले.
एकत्र आले तर आनंदच होईल
मावळचे आमदार सुनील शेळके यांनीही अतुल बेनके यांच्या विधानचं समर्थन केलं आहे. शरद पवार यांचा जुन्नरमध्ये दौरा होता. त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून औपाचारिकता म्हणून अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन स्वागत केलं. त्यांची राजकीय चर्चा झाली नाही. पण उद्याच्या काळात राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्याचा आनंद असेल. पण काही महत्त्वाकांक्षी मंडळी, ज्यांना स्वत:चं हित पाहायचं आहे, ज्यांना राज्यात लवकर मोठं व्हायचं आहे, अशी मंडळी साहेबांना आणि दादांना एकत्र येऊ देणार नाहीत, अशी टीका सुनील शेळके यांनी केली.
काही महत्त्वकांक्षी लोक आहेत. त्यांनी दादांवर टीका केली. अजितदादांचं पक्षासाठी मोठं योगदान आहे. पण काही लोक आम्हीच वारसदार आहोत असं दाखवण्याचं काम करत आहेत. या मंडळींना दादा आणि साहेबांना एकत्र येऊ द्यायचं नाही, असं सांगतानाच दादा साहेब एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल. राजकारणात जे व्हायचं ते होईल. पण मी दादांना कधीच सोडणार नाही. दादांना अविरत साथ देईल, असंही शेळके म्हणाले.
तेच लोक आमचे
बेनके यांच्या या विधानावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बेनके हल्ली कोणत्या पक्षात आहेत? मला माहीत नाही. त्यांच्यात आणि माझ्यात काहीच चर्चा झाली नाही. लोक भेटायला येतात. त्यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा. त्यामुळे भेटलो. साधी गोष्ट आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम केलं तेच लोक आमचे, असं शरद पवार म्हणाले.
अजून बरेच दिवस आहेत
अजित पवार यांनीही बेनके आणि शरद पवार भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. भेट घेतली म्हणून काय झालं? अनेक आमदार माझीही भेट घेतात. बेनके भेटले असतील तर त्यांना विचारा तुम्ही का भेट घेतली? निवडणुकाजवळ आल्यावर काहींना उभं राहायचं असतं. अमक्या पक्षाला जागा सुटेल, आपल्याला सुटणार नाही, त्यामुळे दुसरीकडे गेलं पाहिजे, असा विचार काही लोक करत असतात. ही लोकं इकडं तिकडं जाणारच. इकडचे तिकडे जातील. तिकडचे इकडे जातील अजून बरेच दिवस आहेत. अजून काय काय झालेलं पाहायला मिळेल, असं अजितदादा म्हणाले.
