उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पवार-ठाकरे यांची वर्षावर बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु आहे

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार 'वर्षा'वर, पाऊण तास चर्चा

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ निवासस्थानी गेले होते. यावेळी दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. बैठकीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पवार-ठाकरे यांची बैठक होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. (Sharad Pawar meeting Uddhav Thackery at Varsha Bungalow)

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची 26 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली होती. दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ते एकत्र होते. संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली.

संजय राऊत काय म्हणाले?

“शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ती काही भूमिगत बैठक नव्हती, आम्ही बंकर किंवा तळघरामध्ये भेटलो नव्हतो. त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती” असे संजय राऊतांनी सांगितले.

“मला ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी. त्यासंदर्भात चर्चा केली, एकत्र जेवलो, अगदी गोपनीय पद्धतीने जेवलो” असा टोला राऊतांनी लगावला.

“राजकारणात वैयक्तिक शत्रुत्व नसतं. आम्ही काही वैयक्तिक शत्रू नाही. भाजपसोबत असतानाही मी शरद पवारांशी बोलायचो. उद्धव ठाकरे आजही नरेंद्र मोदींना आपले नेते म्हणतात, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत.” असे राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“आम्हाला सरकारमध्ये यायची कोणतीही घाई नाही. अशा सरकारसोबत मला काहीही तोडगा काढायचा नाही. त्यामुळे मी खूप स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, सध्या परिस्थिती अशी आहे की आमच्या भेटीचे अनेक वेगवेगळे अर्थ काढण्यात आलेत. त्यामुळे हे टायमिंग चुकीचं आहे. मला लोकांचा राग आहे हे माहिती होतं पण त्यांचा इतका राग आहे हे माहिती नव्हतं. पण याचं कोणतंही राजकीय हेतू नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“संजय राऊत यांनी घोषित केलं होतं की, मी फडणवीसांची मुलाखत घेणार आहे. त्यासंदर्भात त्यांचा फोन आल्यानंतर मी त्यांना मुलाखत देईन असे सांगितले होते. मात्र ही मुलाखत अनएडिटेड असली पाहिजे. त्या ठिकाणी माझाही कॅमेरा असेल, अशा काही अटी मी सांगितल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपण भेटून बोलू असं ठरलं होतं,” असे फडणवीसांनी यावेळी सांगितले. (Sharad Pawar to meet Uddhav Thackery at Varsha Bungalow)

संबंधित बातम्या 

फडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत

आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य

आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही, सरकार कोसळेल तेव्हा बघू : देवेंद्र फडणवीस

(Sharad Pawar meeting Uddhav Thackery at Varsha Bungalow)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *