ठाकरे-मोदी भेटीवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत

ठाकरे आणि मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना त्यावर किंचितही विचार करण्याची गरज नसल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय. इतकंच नाही तर त्यांनी महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत केलंय.

ठाकरे-मोदी भेटीवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात झालेल्या संवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच बोलले आहेत. ठाकरे आणि मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना त्यावर किंचितही विचार करण्याची गरज नसल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय. इतकंच नाही तर त्यांनी महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. (Sharad Pawar speaks on Uddhav Thackeray-Narendra Modi meeting)

ठाकरे-मोदी भेटीवर पवार काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्वतंत्र बसून चर्चा केली असं सांगण्यात आलं. त्यांनी काहीही करो, पण लगेच वेगळ्या शंका, वावड्या काही लोकांकडून उठवल्या गेल्या. त्याच्यावर यत्किंचितही विचार करण्याची गरज नाही. हा पक्ष काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आता त्यात शिवसेनाही आली आहे. त्यामुळे काळजीचं कारण नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.

‘महाविकास आघाडी पुढेही जोमानं एकत्र काम करेल’

ठाकरे-मोदी भेटीवर बोलताना पवारांनी महाविकास आघाडी एकसंध राहील असा दावा केलाय. पवार म्हणाले, “मघाशी मी सांगितलं की शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही. पण हा महाराष्ट्र शिवसेनेला काम करताना गेली अनेक वर्षांपासून पाहतोय. माझं स्वत:चा यापूर्वीचा अनुभव एक विश्वास असावा असाच आहे. एक साधं उदाहरण सांगतो, ज्यावेळेला देशात जनता पक्षाची सत्ता आली. त्यावेळी सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असतानाही अशा स्थितीत काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला. तो राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना. शिवसेना फक्त पुढे आली नाही, तर त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतला की, या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना विजयी करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही”.

“तुम्ही विचार करा की, विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि पक्षाचा नेता असा निर्णय घेतो की, आम्ही निवडणुकाच लढणार नाही. त्या नेत्याची स्थिती काय होईल. पण त्याची चिंता कधी बाळासाहेब ठाकरेंनी बाळगली नाही. त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी पाळला, हा इतिहास विसरता येत नाही. त्यामुळे कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीने, ज्या कालखंडात ही ठाम भूमिका घेतली, ती भूमिका ते बदलतील असे आडाखे कुणी बांधत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहतात, एवढंच मी सांगेल. हे सरकार ५ वर्षे टिकेल, काम करेल. फक्त ५ वर्षे नाही तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्र काम करुन सामान्य जनतेचं प्रभावीपणे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असं भाकीतही पवारांनी यावेळी केलं आहे.

आघाडी सरकारचं काम उत्तम

हे आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. कोणी काही म्हणो, इथं आपण वेगळ्या विचारांचं सरकार स्थापन केलं. कधी वाटलं नव्हतं सेनेबरोबर आपण सरकार बनवू. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार पाच वर्ष टिकेल. एव्हढंच‌ नाही तर लोकसभा, विधानसभेला चांगली कामगिरी करेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही: अजित पवार

Sharad Pawar | शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष,राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं प्रशस्तीपत्र

Sharad Pawar speaks on Uddhav Thackeray-Narendra Modi meeting

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI